सुमारे 18 लाखाचा निधी मंजूर : विरक्त मठाला मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट
वार्ताहर /कडोली
येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाला यापूर्वी मदत केलेली आहे आणि यापुढेही मदत करत राहणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. महाशिवरात्रोत्सव निमित्त कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाच्या भेटीप्रसंगी सतीश जारकीहोळी यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी हुक्केरीचे आमदार बाबासाहेब पाटील, कारंजीमठाचे पूज्यश्री गुरुसिद्ध स्वामीजी, पूज्यश्री गुरुबसवलिंग स्वामीजी, निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ आदी मान्यवरांचा मठातर्फे सत्कार करून स्वागत करण्यात आले. प्रसंगी पूज्यश्री गुरुसिद्ध स्वामीजी, पूज्यश्री गुरुबसवलिंग स्वामी, एम. जी. हिरेमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कडोली गावची पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रा. पं. ने पाईपलाईन आणि नूतन विहीर खोदाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी ग्रा. पं. ने सुमारे 18 लाख रुपये मंजूर केले आहे. उर्वरित निधी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून मंजूर होणार आहे. सदर नूतन पाईपलाईन आणि नूतन विहीर खोदाई भूमिपूजन कार्यक्रम मंत्री सतीश जारकीहोळींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रा. पं. तर्फे अध्यक्ष सागर पाटील यांनी सतीश जारकीहोळी यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. याप्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील, सचिव मलगौडा पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्षा दीपा मरगाळे, उदय सिद्दण्णावर, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. भूमिपूजनानंतर मठातील नूतन इमारतीचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते पार पडले.









