पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली : शेतकऱ्यांत चिंता
वार्ताहर /कडोली
गेल्या 3-4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने येथील मार्कंडेय नदीला पूर येऊन पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची शेकडो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळपासून कडोली परिसरात मुसळधार आणि संततधार पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदीला यावर्षी पहिल्यांदा पूर आल्याने पाणी पात्राबाहेर पडले. त्यामुळे नुकतीच लागवड केलेली कोवळी भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. परिणामी ही भात रोपे कुजून जातील याची भीती शेतकऱ्यांना सतावित आहे. नदीकाठचा सर्व भाग आता जलमय झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
नालेही प्रवाहित
सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने शेत-शिवारात पाणीच पाणी झाले आहे. शिवाय पावसामुळे कडोली, केदनूर, देवगिरी, मण्णीकेरी, बंबरगा, कट्टणभावी आदी परिसरातील गौरी नाल्यासह सर्व लहान-मोठे नालेही प्रवाहित झाले आहेत.
रोप लागवडीला जोर
कडोली परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शिवारात मुबलक प्रमाणात पाणी झाले आहे. त्यामुळे रोप लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांची रोप लागवड करण्यासाठी धडपड सुरू आहे. कडोली परिसरात बहुतांशी ठिकाणी भात पेरणी न करता भात रोप लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आता भात रोप लागवडीची कामे जोरात सुरू झाल्याने मजुरांची मोठी टंचाई भासत आहे. बैलजोडीने चिखल करण्याची कामे आता बंद झाली असून पॉवर टिल्लरच्या सहाय्याने चिखल करण्याचे काम वाढले आहे.









