महापौर चषक खो-खो व कबड्डी स्पर्धा
बेळगाव : महानगरपालिका आयोजित महापौर चषक खो-खो व कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शिवाजी हायस्कूल कडोली व आंबेवाडी संघांनी अंतिम फेरीत तर कबड्डीमध्ये गोमटेश व राकसकोप संघांनी अंतिम फेरीत मजल मारली आहे. बेळगाव महानगरपालिका आयोजित महापौर चषक आंतर शालेय 17 वर्षांखालील व आंतर कॉलेज, पदवीधर यांच्यासाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवारपासून सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर तर खो-खो व कबड्डी स्पर्धा धर्मवीर संभाजी उद्यान येथे सुरू झाली. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त शोभा बी., लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, राजशेखर डोणी, नितीन जाधव, रमेश मैलागोळ, सारंग राघोचे, शोभा बी., उदयकुमार, किरण मण्णिकेरी, वीणा विजापुरे, नेत्रावती भागवत, रेश्मा पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करुन शांतीचे प्रतीक असलेले रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून उद्घाटन झाले.
मुलांच्या खो खो स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवाजी हायस्कूल कडोलीने महाराष्ट्र हायस्कूल संघाचा 4 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीत आंबेवाडी संघाने तुरमुरी संघाचा 2 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोमटेश हायस्कूलने मराठा मंडळ किणये संघाचा 2 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवराज हायस्कूल-राकसकोपने मराठा मंडळ-गोजगे संघाचा 9 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी एल बी नाईक, आर. एल. पाटील, ए.व्ही. हुलजी, पी. एस. खोत, पी. जी. पाटील, अविनाश पाटील, उमेश बेळगुंदकर, आनंद पाटील, माया चोपडे,, एन आर पाटील, सुनील बेळगुंदकर, राजु जाधव, एम. एस. सिद्दानी, केशव मायान्नाचे, अनिल जनगौडा, बी सोलोमन, एम. दामले आदी उपस्थित होते. अंतिम सामने शनिवारी दुपारी खेळविले जाणार असून सकाळी मुलींच्या खो खो व कबड्डी स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी अंतिम फेरीनंतर बक्षीस वितरण होणार आहे.









