प्रतिनिधी/ पणजी
कदंब महामंडळाचा 45 वा वर्धापनदिन येत्या गुऊवार दि. 2 ऑक्टोबर अर्थात दसऱ्यादिनी साजरा करण्यात येणार आहे. कदंब महामंडळाच्या पणजी बसस्थानकात सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सन्माननीय अतिथी म्हणून वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री आतानासियो मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे. वर्ष 1985 मध्ये या महामंडळाची स्थापना झाल्यानंतर पणजी ते वाळपई मार्गावरून जीडीएक्स 1 ही पहिली बस धावली होती. त्याला आता तब्बल 45 वर्षे होत आहेत. सदर बस आता कार्यरत नसली तरी महामंडळाने आजही ती सुस्थितीत सांभाळून ठेवली आहे. दरवर्षी वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या बसची पूजा करण्यात येते. यंदाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचे पूजन करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यक्रम होणार आहे.









