मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; कदंबचा 45 वा वर्धापनदिन उत्साहात
पणजी : कदंब बस ही गोव्याची जीवनरेखा आहे. कदंब महामंडळ हे नेहमीच पैशांना प्राधान्य न देता सेवेला प्राधान्य देत आले आहे. सेवानिवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीचा प्रश्न सरकारने विचारात घेतला असून सरकारने आतापर्यंत 50 टक्के थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली आहे. उर्वरित थकबाकी येत्या दोन ते तीन महिन्यांत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पणजी बसस्थानकावर आयोजित केलेल्या कदंब महामंडळाच्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
म्हजी बस योजनेत सहभागी व्हावे
‘म्हजी बस’ योजनेखाली नोंदणी केलेल्या खासगी बसमालकांना आतापर्यंत 2 कोटी ऊपयांचा लाभ सरकारकडून मिळाला आहे. सध्या या योजनेत सरकार दरमहा 18 हजार ऊपये अनुदान देत आहे, जे भविष्यात 25 हजार ऊपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नवीन बस खरेदी करण्यासाठी सरकार 10 लाख ऊपयांपर्यंतचे अनुदान देत आहे. त्यामुळे खासगी बसमालकांनी कोणाचेही न ऐकता त्वरित या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर, वाहतूक खात्याचे संचालक परिमल अभिषेक आणि कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते कदंबच्या पहिल्या जीडीएक्स 1, या 44 सीटरच्या कदंब बसची पूजा करण्यात आली. कदंब महामंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
कदंबच्या 555 बसेस कार्यरत
विविध बसस्थानकांचे अपग्रेडेशन येत्या काळात टप्प्याटप्प्याने होणार असून येत्या 4 रोजी वास्कोच्या बसस्थानकाची पायाभरणी करणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी सवलतीसह स्मार्ट ट्रान्झिट कार्ड येणार असून प्रवाशांनी डिजिटल पासचा पर्याय निवडावा. राज्यात आणि राज्याबाहेर मिळून सध्या 550 वेळापत्रकबद्ध बसेस कार्यरत आहेत. याचबरोबर येत्या काळात इलेक्ट्रिक बसेसदेखील वाढविणार असल्याचे मुख्dयामंत्र्यांनी सांगितले.
प्रवाशांना कदंबच्या अनेक सुविधा : गुदिन्हो
प्रवाशांना रोज वाहतूक सेवा देण्याचे काम कदंब चोखपणे करत आहे. काळानुसार कदंब महामंडळ बदल आणत असून येणाऱ्या काळात कदंब महामंडळाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या 25 हजार स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आली आहेत. तिकिटासाठी इलेक्ट्रॉनिक टेकिंग मशीन्स सुरू केल्या जातील. सर्व मार्गांचे जिओ मॅपिंग करुन अचूकता आणली जाईल. याशिवाय प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बसचे थेट ट्रॅकिंग करता येईल. बस कुठे आहे आणि किती वेळेत पोहोचेल, अशा आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळतील. 26 जानेवारी 2026 पर्यंत कदंब महामंडळाची संपूर्ण यंत्रणा डिजिटल होईल, अशी घोषणा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी केली. यावेळी कदंब कर्मचाऱ्यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कदंब कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचादेखील मुख्dयामंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.









