काणकोणच्या बसस्थानकावरील प्रकार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या कदंब बसस्थानकाची दुरुस्ती आणि देखभाल याकडे कदंब महामंडळाने चालविलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम येथील खासगी बसेस त्याचप्रमाणे प्रवाशांनाही भोगावा लागत आहे. या बसस्थानकावरील गटारावरील लोखंडी आवरण तुटलेले असून 13 रोजी एक कदंब बस त्यावरून मागे घेत असताना बसचालकाचा स्टीअरिंगवरील ताबा गेल्यामुळे पार्क करून ठेवलेल्या दोन खासगी बसेसना त्यने धडक दिली.
त्यामुळे दोन्ही बसेसचे नुकसान झालेले आहे. या बसस्थानकावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या गटारावर लोखंडी आवरण घालण्यात आलेले असून देखभालीच्या अभावामुळे हे आवरण तुटलेले आहे आणि गटारातील पाणी वरून वाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार यासंदर्भात वरिष्ठांना कळवूनही या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून हालचाली झालेल्या नाहीत. वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱया या बसस्थानकावरील पत्रे उडून जाण्याचा प्रकार कधी घडतो. या स्थानकावरील शौचालयाची नीट देखभाल घेतली जात नाही. मोटारसायकल पायलट त्याचप्रमाणे रिक्षाचालकांना नीट निवारा नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.. यासंबंधी वारंवार तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नसल्याच्या प्रवासी वर्गाच्या कैफियती आहेत.









