आमदार प्रवीण आर्लेकर: पेडणेतील कदंबच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
पेडणे : कदंब महामंडळ राज्यात चांगली वाहतूक सेवा देण्याचे कार्य करत आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही कदंबची वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. काही गावात खजगी बस सेवा सुरू असून ती बेभरवशाची बनली आहे. अशा ठिकाणी प्रवाशांच्या मागणी नुसार कदंबने आपली वाहतूक सेवा सुरू करावी, अशी सूचना पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी कदंब महामंडळाला केली आहे. पेडणे तालुका कदंब कर्मचारी संघटनेतर्फे कदंबच्या सेवेतून निवृत्त झालेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार पेडणे शासकीय निवासस्थानात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने आमदार आर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर पेडणे उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, कदंब महामंडळाचे सर व्यवस्थापक संजय घाटे, कोरगाव सरपंच समीर भाटलेकर, कासरवर्णे सरपंच नवनाथ नाईक, वारखंड सरपंच गौरी जोसलकर, सरपंच अनिल शेट्यो, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर उपस्थित होते.
कदंब महामंडळाने नोकऱ्या देऊन अनेकांचे घर, संसार संभाळले आहेत. कामगारांनी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आपला विकास केला. कदंबचे निवृत्त झालेले काही कर्मचारी हे दिग्गज कलाकार असून त्यांनी आपली कला इतरांना देऊन नवीन कलाकार घडवण्याचे काम करावे. कदंब महामंडळाने पेडणेतील कर्मचाऱ्यांना बस स्थानकामध्ये एखादे सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली. आमदार प्रवीण आर्लेकर, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, कदंब महामंडळाचे सर व्यवस्थापक संजय घाटे, सरपंच गौरी जोसलकर, सरपंच प्रार्थना मोटे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये राया नाईक, गुऊदास उस्कैकर, किशोर मांद्रेकर, दत्ताराम मोटे, दयानंद कासकर, भालचंद्र भगत, रामनाथ नाईक, पुऊषोत्तम गावकर व संतोष च्यारी यांचा समावेश होता. तसेच संजय घाटे यांच्या हस्ते आकांक्षा नाईक यांना भेटवस्तू देऊन गौ]िवण्यात आले. कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवा देत असतानाच आपल्या कुटुंबीयांचा आधार बनले आहेत. सेवेतून मिळणाऱ्या पगारांमधून त्यांनी आपलं कुटुंब उभे केले. कठीण प्रसंगी प्रवाशांना वाहतूक सेवा देण्याचे काम कदंब महामंडळ करत आहे. कोरोना काळात जे काही इतर राज्यातील मजूर गोव्यात अडकले होते त्यांना अडीच हजार किलोमीटरपर्यंत कदंबा बसेस घेऊन आठ आठ दिवस प्रवास करत होत्या. पाणी व बिस्किटे खाऊन सेवा दिली. त्या कार्याचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे., असे संजय घाटे यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक बससेवेसाठी पंचायतीनी पुढाकार घ्यावा: घाटे
कदंब महामंडळाला आता राजाश्र्रय मिळत आहे. लवकरच अतिरिक्त इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात सामील होणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा गावागावात सुरू करण्यासाठी प्रत्येक पंचायतीने पुढाकार घ्यावा. आपल्या पंचायत क्षेत्रात चार्जिंग स्टेशन उपलब्ध करावे किंवा चार्जिंग स्टेशनसाठी पंचायतीनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन संजय घाटे यांनी केले.









