मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
पणजी ; खासगी बसेस भाडेपट्टीवर घेऊन त्या कदंब परिवहन महामंडळाकडे चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रशासकीय बैठकीत सोमवारी अंतिम मान्यता देण्यात आली. आता येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अधिसूचना जारी कऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंत्रालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीस वाहतूक सचिव, वाहतूक संचालक, कदंबचे वरिष्ठ अधिकारी इत्यादी उपस्थित होते. वाहतूक संचालक सातार्डेकर यांनी या संदर्भात फाईल समोर ठेवली. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी बैठकीनंतर सांगितले की, राज्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये बसेसनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. खासगी आणि कदंब बसेस यांच्यात कैकवेळा स्पर्धा होतात. काहीवेळा खासगी बसेसच्या आपसात स्पर्धा लागतात. बऱ्याचवेळा खासगी बसेस अचानक रद्द होतात. प्रवाशांची धांदल होते व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच कोलमडते. त्यावर उपाय म्हणून तसेच खासगी बस चालकांचेही हित लक्षात घेऊन आम्ही खासगी बसेस संपूर्ण गोवाभरातील मार्गांसाठी भाडेतत्त्वावर घेणार आहोत. त्या बदल्यात त्यांना प्रतिकिमीचे भाडे देऊ. दिवसाकाठी किमान 180 कि.मीचे भाडे त्यांना देण्यात येणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.
दरदिवशी किमान 180 कि.मी.चे भाडे
ही योजना लवकरात लवकर सुऊ करणार आहोत. यामुळे कोणतीही स्पर्धा राहाणार नाही. खासगी बसचालकांच्या सुस्थितीत असलेल्या सर्व बसेस भाडेपट्टीवर घेण्याची कदंबची तयारी आहे. ज्यांना ही योजना आवडणार त्यांनी आपल्या बसेस कदंबला द्याव्या. मार्गावरील वाहतूक कशी आहे या आधारे प्रतिकिमीचे दरही निश्चित केले जातील. किमीप्रमाणे पैसे दिले जातील व दिवसाकाठी किमान 180 किमीचे पैसे खासगी बसचालकांच्या खात्यावर जातील. त्यापेक्षा जास्त चालविली असेल तर त्याचे ज्यादा पैसे त्यांना मिळतील.
चालक खासगी मालकाचा, वाहक कदंबचा
या योजनेंतर्गत खासगी बसचालकांनी आपल्या बसेस कदंबला द्याव्यात. देखभाल, दुऊस्ती, डिझेल वगैरे खासगी वाहनचालकांचे. चालक देखील त्यांचा. पैसे घेणे व त्यांचा मार्ग निश्चित करणे वगैरे कदंब ठरविणार आहे. किमान ऊ. 29 पासून ऊ. 36 पर्यंत प्रतिकिमी या प्रमाणे त्यांचे पैसे त्यांना दिले जातील. वाहकाचे काम हे कदंबचे कर्मचारी करतील. त्यातून ऑनलाईन तिकीट वगैरे सर्व काही कदंब महामंडळ करणार आहे. योजनेवर सोमवारी अंतिम मान्यता देण्यात आली. आता या संदर्भातील फाईल सरकारकडे पाठविली गेली. आगामी मंत्रिमंडळात मान्यतेसाठी ती घेतली जाणार आहे. खासगी बसचालकांना कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.









