या हल्ल्यात शिंगे यांच्या हाताचे बोट तुटून पडले होते
इचलकरंजी : प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याचा रागातून चौघांनी दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये प्रमोद बाबासो शिंगे (वय 39, रा. सिद्धार्थनगर, कबनूर), त्यांची पत्नी अश्विनी शिंगे गंभीर जखमी झाले आहेत. शिंगे यांच्या कारiचीही तोडफोड केली आहे. या हल्ल्यात शिंगे यांच्या हाताचे बोट तुटून पडले होते. याची फिर्याद जखमी प्रमोद शिंगे यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी जमीर हसीम मुल्लाणी (वय 54), आर्यन जमीर मुल्लाणी (वय 30, दोघेही रा. जांभळी, ता. शिरोळ) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना कबनूर येथील ग्रामपंचायतजवळ शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी प्रमोद शिंगे यांच्या मित्राने संशयित जमीर मुल्लाणी यांच्या मुलीशी लग्न केले होते. या विवाहात शिंगे यांनी मदत केली होती. त्याचा राग आल्याने प्रमोद आणि त्यांची पत्नी कबनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले असता तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला, यामध्ये प्रमोद यांच्या मान व हातावर वर्मी घाव बसले.
त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट तुटले. पत्नी अश्विनी आडव्या आल्याने त्यांच्या हातावरही गंभीर वार केले. त्यानंतर संशयितांनी शिंगे यांच्या चारचाकीची तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी जमाव जमल्याने संशयितांनी कोयते घटनास्थळी टाकून दिले होते
घटनास्थळावरून पोलिसांनी कोयते जप्त केले आहेत. जखमींना तत्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी प्रमोद यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी रुग्णालय व घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी जमीर मुल्लाणी, त्याचा मुलगा आर्यन मुल्लाणी आणि दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनी हल्ला व अॅट्रॉसिटीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कबनूर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे








