गोवा राज्य, विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व – कर्णधार म्हणून उत्कृष्ट योगदान
नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा
कबड्डी या देशी खेळाला आज चांगले दिवस येत आहेत. युवा खेळाडू या खेळात आकर्षित होत असताना दिसतात. देशात होणाऱ्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा खेळाडूंवर प्रभाव पडत आहे. गोव्याच्या कबड्डी क्षेत्रात लाडेवाडा मडकई येथील लक्ष्मण पपन्ना गौडा हा एक उमदा खेळाडू नावारुपास येत आहे. राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेत तो चमकदार कामगिरी करीत असून राज्य पातळीवरील स्पर्धेत तो आकर्षण ठरत आहे. उत्कृष्ट रेडर म्हणून त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. 23 वर्षीय लक्ष्मणने दोनवेळा स्कूल नॅशनल गेम्समध्ये, 3 वेळा 19 वर्षांखालील ज्युनियर संघात तर दोन वेळा सिनीयर संघात गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले असून संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. त्याचबरोबर आंतर विद्यापीठ स्पर्धेत गोवा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
मडकई येथील श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूलमध्ये नववीत शिकत असताना त्यांनी कबड्डी खेळाला प्रारंभ केला. स्वत: एक उत्कृष्ट क्रीडापटू असलेल्या शारीरिक शिक्षक विश्वास प्रभूदेसाई यांनी त्याला हायस्कूलच्या कबड्डी संघात खेळण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या तालमीत लक्ष्मणने खेळाचे ज्ञान लवकरच आत्मसात केले. आंतरशालेय स्पर्धेत त्याने हायस्कूलसाठी अनेक अजिंक्यपदे मिळवून दिली. या कामगिरीमुळे त्याची स्कूल नॅशनल गेम्ससाठी गोवा संघात निवड झाली. 2017 साली मध्यप्रदेश येथे व 2019 साली दिल्ली येथे झालेल्या स्कूल नॅशनल गेम्स स्पर्धेत खेळून सुरेख कामगिरी केली. आंतर उच्च माध्यमिक स्पर्धेत जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालय संघाला त्याने अजिंक्यपद मिळवून दिले.
गोवा संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी
2019 साली पश्चिम बंगाल येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत गोव्याच्या संघाने उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 2020 साली हरियाना येथे झालेल्या स्पर्धेत गोव्याला प्रथमच कास्यपदक प्राप्त झाले. यात लक्ष्मणचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तेलंगणा येथे 2021 साली झालेल्या स्पर्धेतही त्याचा सहभाग होता. याच साली अयोध्या येथे सिनीयर राष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्मणला गोवा संघाचा कर्णधार होण्याचा मान मिळाला. या स्पर्धेत त्यांनी उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली. 2022 साली हरियाना येथे झालेल्या स्पर्धेत त्याने कास्यपदक मिळवून दिले. 2022 साली गुजरात येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याचा सहभाग होता. आज जशी ‘प्रो-कबड्डी’ स्पर्धा खेळविण्यात येत आहे त्याच धर्तीवर भारतीय कबड्डी फेडरेशनतर्फे ‘युवा कबड्डी सिरीज’ स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. 2023 साली त्यांने तामिळनाडू येथे झालेल्या स्पर्धेत मराठा मार्वेल्स या संघातर्फे भाग घेतला व त्यानंतर 2024 साली कोईंम्बतूर येथील स्पर्धेत डिव्हीजन थ्रीमध्ये अजिंक्यपद पटकावले.
उत्कृष्ट खेळाडूचे पुरस्कार
राज्यातील कबड्डी स्पर्धेत लक्ष्मण मडकई रेडर्सतर्फे खेळत आहे. गोवा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या सबज्युनियर स्पर्धेत त्याला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला. 2019 साली ज्युनियर स्पर्धेत उत्कृष्ट डिफेंडर्सचा पुरस्कार तर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. फोंडा येथे 2024 साली झालेल्या दळवी चषक स्पर्धेत त्याने उत्कृष्ट रेडर म्हणून पुरस्कार पटकावला आहे.
मार्गदर्शक, प्रशिक्षक, प्रायोजकांचे आभार
आजपर्यंतच्या वाटचालीस लक्ष्मणला अनेक जणांनी मदतीचा हात दिला आहे. पहिले प्रशिक्षक विश्वास प्रभूदेसाई, गोवा संघाचे प्रशिक्षक प्रशांत मुकूल (महाराष्ट्र), इतर प्रशिक्षक सदोदीत मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे गोवा कबड्डी असोसिएशनचे दत्ताराम कामत यांचे तो आभार मानत आहे. मंत्री सुदिन ढवळीकर व मिथील ढवळीकर यांनी मडकई रेडर्स संघ स्थापन करण्यासाठी भरघोस मदत केली आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते नेहमी प्रोत्साहन देतात व मदत करतात, असे लक्ष्मण सांगतो.
बीपीएडचे शिक्षण
लक्ष्मणने दहावी पर्यंतचे शिक्षण करंजाळ-मडकई येथील श्रीमती आंनदीबाई महानंदू नाईकम यांच्या हायस्कूलमध्ये घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण जीव्हीएम एसएनजेए विद्यालयात तर खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातून त्याने कला शाखेत पदवी मिळवली. सध्या तो पणजी येथील डॉन बॉस्को महाविद्यालयात बीपीएडच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रात कारकिर्द करण्याचा त्याचा मानस आहे.
कबड्डी खेळात कारकीर्द करण्यास संधी
आज कबड्डी खेळाला उज्ज्वल भवितव्य असल्याचे लक्ष्मण सांगतो. दणकट शरीर, वेग, चपळता, लवचिकता, स्ट्राँग माईंड, क्वीक रिअॅक्मशन व निर्णय क्षमता ही कौशल्ये असल्यास खेळाडू उज्ज्वल कामगिरी करू शकतो. यापूर्वी लाईमलाईट असलेल्या खेळातच युवावर्ग आकर्षित होत असे. मात्र आता कबड्डी या देशी खेळात अनेक तरुणवर्ग खेळताना दिसत आहेत. देशी खेळासाठी काही योजना केल्यास युवा पिढी कबड्डीतही बहुमूल्य योगदान देतील, असा विश्वास त्यांने व्यक्त केला.









