वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने पुरुष व महिला कबड्डी संघांची घोषणा केली असून पुरुष संघात स्टार रेडर्स नवीन कुमार व पवन सेहरावत यांना त्यात स्थान मिळाले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने 12 सदस्यीय संघ क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केला. 12 सदस्यीय महिला संघाचीही निवड करण्यात आली आहे. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्य मिळविणाऱ्या संघातील साक्षी कुमारी, सोनाली विष्णू शिंगटे व रितू नेगी यांना त्यात स्थान मिळाले आहे.
अलीकडेच झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील टॉपचा रेडर अर्जुन देशवालची या संघात निवड झाली असून अनुभवी बचावपटू परवेश भैन्सवाल, विशाल भारद्वाज, सुनील कुमार हेही या संघातील सदस्य आहेत. मात्र 2018 मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत वरील निवड झालेल्या बारापैकी एकही कबड्डीपटू सहभागी झाला नव्हता. जकार्ता आशियाई स्पर्धेत भाग घेतलेल्या परदीप नरवाल व दीपक निवास हुडा यांना मात्र या संघात स्थान मिळालेले नाही. पुरुष संघाची निवडचाचणी नवी दिल्लीत 9 जुलै रोजी तर महिलांची चाचणी बेंगळूरमधील साई सेंटर येथे 10 जुलै रोजी घेण्यात आली होती.
चीनमधील बीजिंग येथे 1990 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा सर्वप्रथम समावेश करण्यात आला होता. त्यानंतरच्या प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकाराचा समावेश झाला आहे. आतापर्यंत झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने आठपैकी 7 वेळा सुवर्णपदके मिळविली आहेत. 2018 मध्ये झालेल्या मागील आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी उपांत्य फेरीत भारताला इराणने पराभूत केले होते. आतापर्यंतच्या आठ आशियाई स्पर्धांत भारताने केवळ दोन सामने गमविले आहेत. जकार्तामध्ये भारताला दोन पराभव स्वीकारावे लागले होते. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताने इराणचा पराभव करून जेतेपद पटकावले होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला पुरुष संघ : नितेश कुमार, परवेश भैन्सवाल, सचिन, सुरजीत सिंग, विशाल भारद्वाज, अर्जुन देशवाल, अस्लम इनामदार, नवीन कुमार, पवन सेहरावत, सुनील कुमार, नितीन रावल, आकाश शिंदे. महिला संघ : अक्षिमा, ज्योती, पूजा, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निधी शर्मा, सुषमा शर्मा, स्नेहल प्रदीप शिंदे, सोनाली विष्णू शिंगटे.









