वृत्तसंस्था/ इंदोर
दुबईमध्ये 16 जूनपासून सुरु होणाऱ्या महिलांच्या कबड्डी लीग स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण येथे मोठ्या थाटात करण्यात आले.

सदर स्पर्धा 16 ते 27 जून दरम्यान दुबईमध्ये खेळविली जाणार असून या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे. राजस्थान रायडर्स, दिल्ली डायनामाईट्स, गुजरात एंजल्स, ग्रेट मराठा, हरियाणा हसलर्स, पंजाब पँथर्स, उमा कोलकाता आणि बेंगळूर हॉक्स यांचा समावेश आहे. 2023 च्या महिलांच्या कबड्डी लिग स्पर्धेचे स्पर्धागीत तयार करण्यात आले असून त्याचेही रविवारी रात्री अनावरण झाले. या समारंभाला आठ संघांचे कर्णधार तसेच फ्रँचायजी, प्रशिक्षक व कबड्डी शौकिन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा या स्पर्धेचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत. पहिल्यांदाच महिलांची कबड्डी लिग स्पर्धा भरविली जात असल्याने या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास या स्पर्धेचे प्रमुख कार्यकारी प्रदीपकुमार नेहरा यांनी व्यक्त केला.









