
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या कबड्डी या क्रीडा प्रकारात भारताने थायलंडचा पराभव केला. पुरुषांच्या विभागात बुधवारी झालेल्या सामन्यात आतापर्यंत सातवेळा कबड्डीचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष संघाने थायलंडचा 63-26 असा पराभव केला. तर महिलांच्या विभागातील सामन्यात भारतीय महिला संघाने थायलंडचा 54-22 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला. 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या प्रकारात भारतीय पुरुष संघाने मंगळवारच्या सामन्यात बांगलादेशवर 55-18 अशा गुणांनी विजय मिळवला होता. तर महिलांच्या विभागात भारताला सोमवारच्या सामन्यात चीन तैपेईने 34-34 असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात द. कोरियावर 56-23 असा विजय मिळवला होता.
सात्विक-चिराग विजयी
बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या टॉप सिडेड सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
बुधवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत सात्विक साईराज आणि चिराग यांनी इंडोनेशियाच्या कॅमेंडो आणि मार्थिन यांचा 24-22, 16-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 84 मिनिटे चालला होता. त्याचप्रमाणे भारताच्या एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने पुत्री वर्दानीवर 21-16 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले तर पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयने कझाकस्तानच्या पेनारिनचा 21-12, 21-13 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. मात्र महिला दुहेरीमध्ये भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे तर मिश्र दुहेरीत तनीषा क्रेस्टो आणि साई प्रतिक कृष्णप्रसाद यांचे आव्हान समाप्त झाले आहे.
ब्रिज : अंतिम फेरी गाठत किमान रौप्य निश्चित
ब्रिज या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघाने चीनचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे भारतीय पुरुष संघाचे या क्रीडा प्रकारातील किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत या या प्रकारात भारताने कास्यपदक मिळवले होते. आता शुक्रवारी सुवर्णपदकासाठी भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने चीनचा 155.60-135 गुणांनी पराभव केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्पीड क्लायबिंग रिले प्रकारामध्ये भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. या क्रीडाप्रकारात चीनने पात्र फेरीअखेर 21.887 गुणासह पहिले स्थान तर द. कोरियाने दुसरे, इंडोनेशियाने तिसरे व कझाकस्तानने चौथे स्थान मिळवले आहे. हे पहिले चार संघ शेवटच्या आठव्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
हु









