वृत्तसंस्था/ सेरबुकेन (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 2022 च्या हायलो खुल्या सुपर-300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या दुहेरीत भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या माजी टॉप सीडेड किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीचा 21-13, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये 39 मिनिटात पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. 2018 साली जोनाथन ख्रिस्टीने आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. उपांत्य फेरीत किदाम्बी श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या अँथोनी गिनटिंगशी होणार आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गिनटिंगने श्रीकांतचा पराभव केला होता.

महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी चीन तैपेईच्या हेसु चिंग आणि लिन चिंग यांचा 21-17, 18-21, 21-8 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य लढतीत त्रीसा आणि गायत्री यांचा सामना थायलंडच्या ए. बेनेपा आणि एन. एमसार्दशी होणार आहे. भारताच्या या जोडीने 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मात्र, पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. इंग्लंडची सातवी मानांकित जोडी बेन लेनी आणि सिन व्हेंडे यांनी चिराग आणि सात्विकसाईराज यांचा 21-17, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या एकेरीत भारताच्या मालविका बनसोडचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंगने मालविकाचा पराभव केला.









