वृत्तसंस्था/ शेनझेन
येथे सुरू झालेल्या चायना मास्टर्स बीडब्ल्यूएफ सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेन यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्य सेनला चीनच्या सातव्या मानांकित शी युकीकडून 19-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. जागतिक 24 व्या मानांकित किदाम्बी श्रीकांतला वर्ल्ड चॅम्पियन थायलंडच्या कुनलावत वितिडसर्नने चुरशीच्या लढतीत 15-21, 21-14, 13-21 असे हरविले. वर्ल्ड टूरवरील श्रीकांतची पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची सलग तिसरी वेळ आहे. या मोसमात तो केवळ चार स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता.
भारताचा युवा खेळाडू प्रियांशू राजावतही पराभूत झाला असून त्याला जपानच्या केन्टा निशिमोटोने 21-17, 21-14 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. एचएस प्रणॉय व पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांचे दुसऱ्या फेरीचे सामने गुरुवारी होणार आहेत.









