वृत्तसंस्था/ लखनौ
भारताच्या किदाम्बी श्रीकांतला येथे सुरू असलेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. मात्र युवा खेळाडू उन्नती हुडाने आपल्याच देशाच्या आकर्षी कश्यपचे आव्हान संपुष्टात आणत या सुपर 300 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
माजी जागतिक अग्रमानांकित श्रीकांतला कोरियाच्या चिया हाओ ली याने 23-21, 21-8 असे हरविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील त्याची निराशाजनक कामगिरी पुढे चालू राहिल्याचे या पराभवातून दिसून आले. 16 वर्षीय उन्नती हुडाला महिला एकेरीतील एक प्रतिभावान खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. तिने एका गेमची पिछाडी भरून काढत आकर्षीवर 15-21, 21-19, 21-18 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. 77 मिनिटे ही लढत रंगली होती. तिची पुढील लढत जपानच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन नोझोमी ओकुहाराशी होईली. ओकुहाराने भारताच्या मालविका बनसोडवर 18-21, 21-17, 21-10 अशी मात केली. अनुपमा उपाध्याय व अश्मिता चलिहा यांनीही एकेरीत आगेकूच केली. अनुपमाने डेन्मार्कच्या अमेली शुल्झचा 14-21, 21-15, 21-9 असा तर अश्मिताने युक्रेनच्या पोलिना बुहरोव्हाचा 21-15, 21-15 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत अर्लीन्स मास्टर्स स्पर्धा जिंकणारा प्रियांशू राजावत, डेन्मार्क मास्टर्स विजेता किरण जॉर्ज, सतीश कुमार करुणाकरन यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. प्रियांशू राजावतने कझाकच्या दिमित्री पानारिनचा 21-17, 21-19, किरण जॉर्जने लक्ष्य सेनचा भाऊ चिराग सेनचा 21-16, 14-21, 21-13, सतीश करुणाकरनने चिनी तैपेईच्या हुआंग यु काइचा पराभव केला. प्रियांशूची पुढील लढत सतीश करुणाकरनशी, किरण जॉर्जची लढत चियाशी होईल.
समीर वर्माला मात्र चिनी तैपेईच्या वांग त्झू वेईकडून संघर्षानंतर 9-21, 21-17, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा व तनिषा क्रॅस्टो यांनी आपल्याच देशाच्या समृद्धी सिंग व सोनाली सिंग यांच्यावर 21-8, 21-9 असा विजय मिळवित दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांची पुढील लढत भारताच्याच रुतुपर्णा पांडा व श्वेतपर्णा पांडा यांच्याशी होणार आहे.









