राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा; गेंदियावर 3-0 गोलने एकतर्फी विजय; सानिका पाटीलचे दोन गोल
कोल्हापूर प्रतिनिधी
पालघर येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतर जिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी के.एस.ए. च्या कोल्हापूर जिल्हा संघाने गोंदिया जिल्हा संघावर 3-0 गोलने लिलया विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बाद पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे.
गोंदिया विरूद्धच्या लढतीत कोल्हापूर संघाचे वर्चस्व राहिले. सानिका पाटीलने 19 व्या मिनिटाला प्रतिक्षा मिठारीच्या पासवर चेंडूला जाळे दाखवत संघाचे गोल खाते उघडले. 32 व्या मिनिटाला समृद्धी कटकोळेला मोठय़ा डी भागात प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने अवैधरित्या अडविल्याबद्दल पेनल्टी मिळाली. वैष्णवी डोमलेने पेनल्टीवर 32 व्या मिनिटाला गोल नोंदविला. पुन्हा सानिका पाटीलने 68 व्या मिनिटाला आर्या मोरेच्या पासवर गोल नोंदवून संघास 3 गोनले आघाडीवर नेले. अखेरपर्यंत हिच आघाडी कायम राहून हा सामना के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने विजय संपादन केला. या लढतीत सानिका पाटील व समृद्धी कटकोळे यांनी आघाडी फळीत तर आर्या मोरे व प्रणाली चव्हाण यांनी मध्यम फळीत व मृणाल खोत व रिया बोळके यांनी डिफेन्स फळीत उत्कृष्ट खेळ करून विरूद्ध संघांतील खेळाडूंना रोखून ठेवले. संघाचे मार्गदर्शक म्हणून अमित साळोखे व पृथ्वी गायकवाड यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
उपांत्य फेरीत पुणे किंवा पालघरबरोबर लढत
उपांत्य फेरीत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाची पुणे आणि पालघर यांच्यातील विजयी संघाबरोबर शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.