राजू सेठ आर्ष कारवार संघ उपविजेता, संतोष सुळगे-पाटील मालिकावीर, नरेंद्र मांगोरे सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा चांदीलकर, उत्कृष्ट फलंदाज गौस शेख
बेळगाव : के आर शेट्टीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आमदार राजू सेठ आर्ष इलेव्हन कारवार संघाचा 13 धावांनी पराभव करून डॉ. सतीश जारकीहोळी चषक पटकावित 3 लाख 50 हजाराचे बक्षीस मिळविले. नरेंद्र मांगोरे याला सामनावीर तर संतोष सुळगे-पाटील याला मालिकावीराने गौरविण्यात आले. सरदार्स मैदानावरती भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा वाल्मिकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. सतीश जारकीहोळी चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमदार राजू सेठ अर्ष इलेव्हन कारवार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना के. आर. शेट्टी संघाने 8 षटकात 7 गडी बाद 84 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगोरेने 6 चौकारांसह 26, रब्बानी दफेदार व शफिक यांनी प्रत्येकी 14 तर रोहित पाटीलने 1 षटकार 1 चौकारांसह 13 धावा केल्या. आर्ष कारवारतर्फे कृष्णा चांदीलकरने 11 धावांत 3, गौस शेखने 9 धावात 2 तर कुलदीपने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्या डावात राजू सेठ आर्ष कारवार संघाने 8 षटकात 4 गडी बाद 88 धावा करून 4 धावांची आघाडी मिळविली. त्यात वाहिद अब्दुलने 3 षटकार 1 चौकारांसह 17 चेंडूत 32, गौस शेखने 2 षटकारांसह 16 तर योगेश एम. ने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 20 धावांत 2 तर मदीन मुल्ला व आकाश कटांबळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
4 धावांच्या पिछाडीवर असलेल्या के. आर. शेट्टी संघाने दुसऱ्या डावात 8 षटकात 4 गडी बाद 73 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगोरेने 2 षटकार 1 चौकारांसह 18 चेंडूत 28, अभिषेक देसाईने 1 षटकार 3 चौकारांसह 11 चेंडूत 23 तर संतोष सुळगे पाटीलने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. आर्ष कारवारतर्फे कृष्णा चांदीलकर, डॉम्निक फर्नांडिस, गौस शेख व इम्रान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 70 धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना आर्ष कारवार संघाने 8 षटकात 9 गडी बाद 56 धावाच केल्या. त्यात वाहित अब्दुलने 1 षटकार 2 चौकारांसह 15 तर डॉम्निक फर्नांडिसने 1 षटकार 1 चौकारसह 12 धावा केल्या. 4 षटकापर्यंत सामना समतोल चालला होता. पण संतोष सुळगे पाटीलने 1 षटकात 2 गडी बाद करत 2 धावा करून सामन्याचे रूप के. आर. शेट्टीकडे वळविले. त्यानंतर किरण तारळेकर, श्रेयस मातीवड्डर यांनी अर्ष कारवार संघाच्या फलंदाजांना फिरकीवर बांधून ठेवल्यामुळे 13 धावांनी सामना गमवावा लागला. अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी संघाने सर्व खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन घडविले. त्यांच्या सुळगे पाटीलने 11 धावात 3, किरण तारळेकरने 15 धावात 2 तर श्रेयस मातीवड्डरने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बसवाण्णप्पा दुंडगनट्टी, परशराम दुडगनट्टी, राजशेखर तलवार, मिलिंद भातकांडे, भीमराव नाईक, वीरनगौडा पाटील, अभिनंदन व अमोघ वर्षा दुंडगनट्टी यांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी संघाला आकर्षक चषक व 3 लाख 50 हजार रुपये रोख तर उपविजेत्या आमदार राजू सेठ आर्ष कारवार संघाला 2 लाख रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर नरेंद्र मांगोरे के. आर. शेट्टी, अंतिम सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू वाजित अब्दुल आर्ष इलेव्हन, उत्कृष्ट फलंदाज गौस शेख आर्ष इलेव्हन, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा चांदीलकर आर्ष इलेव्हन यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तर मालिकावीर व अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या संतोष सुळगे पाटीलला मान्यवरांच्या हस्ते फ्रीज, रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील पाटील कोल्हापूर, प्रदीप शिंदे मुंबई, बालाजी पाटील मुंबई, आनंद माळवी बेळगाव यांनी तर स्कोरर म्हणून शिवानंद पाटील, प्रवेश पाटील यांनी काम पाहिले. सामन्याचे समालोचक नासीर पठाण, आरिफ बाळेकुंद्री, अभी असलकर, उमेश मजुकर व प्रमोद जपे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रूपेश पावले, मिलिंद चव्हाण, प्रफुल्ल किणयेकर, मॅथ्यू लोबो, अनिल कासेकर, तीर्थकुमार पुंडलिक घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.









