बेळगाव : विजापूर येथील मुद्देबिहाळ येथे ईजेरी क्रिकेट अकादमी व कृष्णा क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 35 वरील ऑल इंडिया खुल्या पिंकबॉल लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सोलापूर संघाने बेळगावच्या केआर शेट्टी संघाचा 3 धावानी पराभव करून अखिल भारतीय चषकाचे मानकरी ठरले. अलिम माडीवाले याला उत्कृष्ट फलंदाज तर नवेद मंगोली यांना उत्कृष्ट गोलंदाजाने गौरविण्यात आले. मुद्देबिहाळ येथे ज्येष्ठ क्रिकेट पटूंना प्रोत्साहन देण्यासाठी निमंत्रितांच्या अखिल भारतीय 35 वरील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर, विजापूर, बागलकोट व बेळगाव संघानी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजापूरने प्रथम फलंदाजी करताना 15. षटकात 5 गडीबाद 142 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी बेळगाव संघाने 15 षटकात 6 गडीबाद 144 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला त्यात कर्णधार प्रणय शेट्टी याने 5 षटकार, 6 चौकारासह 40 चेंडूत 70 धावा, अलिम माडीवालेने 4 षटकार, 3 चौकारासह 40, रवी पिल्लेने 3 चौकारासह 15 धावा केल्या.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलापूर संघाने बागलकोट संघाचा 20 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना अधुंख प्रकाशामुळे 8 षटकाचा खेळविण्यात आला. सोलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडीबाद 60 धावा केल्या. त्यात विशालने 35 धावा केल्या. बेळगावतर्फे बबलुने 11 धावात 2, नाशिर पठाणने 14 धावात 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगावने 8 षटकात 7 गडीबाद 56 धावाच केले. त्यात अलीम माडीवालेने 2 षटकार, 4 चौकारासह 28, रवी पिल्लेने 2 चौकारासह 16 धावा केल्या. सोलापुरतर्फे अभिजितने 3 गडीबाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते विजेत्या सोलापूर संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम तर उपविजेत्या बेळगाव के. आर. शेट्टी संघाला रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेळगावच्या अलिम माडीवाले तर उत्कृष्ट गोलंदाज विजापूरच्या नवेद मंगोली याला देण्यात आले.









