एसकेई विजयी, साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित साईराज चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत के. आर.शेट्टी लायाज संघाने मलतवाडकर अकादमीचा 141 धावाने तर एसकेईने पालेकर अकादमीचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वयम खोत, अद्वैत भट्ट यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.व्हॅक्सिनडेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात के.आर. शेट्टी किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडी बाद 243 धावा केल्या. त्यात स्वयंम खोतने 2 षटकार 15 चौकारांसह 92, यश चौगुलेने 13 चौकारांसह 73, मंदार कुट्रेने 4 चौकारासह 33 धावा केल्या.
मलतवाडकर अकादमीतर्फे युवराज व प्रथमेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मलतवाडकर अकादमीने 25 षटकात 8 गडी बाद 100 धावा केल्या. त्यात प्रथमेश जाधवने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्जतर्फे स्वयंम खोतने 13 धावांत 3 तर कुंदन पाटीलने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात एसकेई क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 131 धावा केल्या. त्यात यश गुरवने 5 चौकारासह 32, दक्षने 5 चौकारांसह 26, श्रावण पाटीलने 4 चौकारांसह 31, मिरसाब बी.ने 20 धावा केल्या. पालेकर अकादमीतर्फे फरान नदाफने 2 तर सनी व सुफान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद पालेकर अकादमीचा डाव 18.3 षटकात 94 धावांत आटोपला. त्यात सनी समर्थने 4 चौकारांसह 23 तर वरुण के.ने 4 चौकारांसह 27 धावा केल्या. एसकेईतर्फे अद्वैत भट्टने 3 तर निशांत नायक, मीरसाब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









