डॉ. सतीश जारकीहोळी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा वाल्मिकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून आर्ष इलेव्हनने नील बॉईज हिंडलग्याचा, के. आर. शेट्टीने सरकार माऊली-होसपेटचा तर मोहन मोरे बागलकोट संघाने बालाजी स्पोर्ट्सचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डॉमनिक फर्नांडीस (आर्ष), रब्बानी दफेदार-के. आर. शेट्टी, अनिल नाईक-मोहन मोरे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आर्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 94 धावा केल्या. त्यात गौस शेखने 4 षटकार 3 चौकारासह 16 चेंडूत 38, डॉमनिक फर्नांडीसने 13,अनु मजलीकरने 10 धावा केल्या. नील बॉईजतर्फे तनिष्क नाईकने 32-2, सुशांत कोवाडकर व अनिकेत लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईज हिंडलगाने 8 षटकात 8 गडी बाद 76 धावा केल्या. त्यात प्रवीण काळेने 3 षटकारासह 29, साकीब लंगोटीने 2 चौकारासह 18, तनिष्क नाईकने 2 षटकारासह 16 धावा केल्या. आर्षतर्फे इम्रान के.ने 3 गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सरकार माऊली-होसपेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 61 धावा केल्या. त्यात कलंदर होसपेटने 1 षटकार 2 चौकारासह 14, मोहीन भाईजानने 12 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे रब्बानी दफेदार, संतोष सुळगे-पाटील, किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 2 तर आकाश कटांबलेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 3.3 षटकात 1 गडी बाद 67 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात रब्बाफी दफेदारने 2 षटकार 4 चौकारासह 10 चेंडूत 32, नरेंद्र मांगोरेने 2 षटकार 1 चौकारासह 9 चेंडूत 22 तर अभिषेक देसाईने 2 षटकारासह 12 धावा केल्या. सरकारतर्फे वाहीदने 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्स बेळगावने फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 69 धावा केल्या. त्यात चंदन तलवारने 2 षटकार 3 चौकारासह 29, अजय भोसलेने 10 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे नील नाईकने 7-3, मोहसीन बिस्तीने 16-2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरेने 6.2 षटकात 3 गडी बाद 72 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात रघु सोमेश्वरने 1 षटकार 7 चौकारासह 18 चेंडूत 40, मुत्तू नायकने 2 षटकारासह 16 धावा केल्या. बालाजीतर्फे दीपक नार्वेकरने 20 धावांत 2 तर चंदन तलवारने 1 गडी बाद केला. चौथ्या सामन्यात पावसाच्या व्यत्यय आल्यामुळे बुधवारी सकाळी हा सामना खेळविण्यात येणार आहे. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरणसिंग रजपूत, दयानंद पाटील, मंजुनाथ रेड्डी, संजीव नाईक, ध्रुव भातकांडे, राजशेखर तलवार, मिलिंद भातकांडे व इतर मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. बुधवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.









