वृत्तसंस्था/ मँचेस्टर ड्यूक
इंग्लंडविऊद्ध मँचेस्टर येथे होणारा चौथा कसोटी सामना जसजसा जवळ येत आहे तसतसा लक्ष वेधून घेणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा भारतीय सलामीवीर के. एल. राहुलशी निगडीत आहे. तो आतापर्यंत इंग्लंडमध्ये कारकिर्दीला वेगळे वळण देणारी मालिका खेळली आहे आणि 9,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यापासून तो फक्त 60 धावा दूर आहे.
मालिका 2-1 ने इंग्लंडच्या बाजूने असल्याने भारताला या स्पर्धात्मक इंग्लिश संघाला आव्हान देण्यासाठी जोरदार कामगिरी करावी लागेल. त्यासाठी राहुलने फलंदाजीची सुऊवात करताना सर्व दबाव सहन करणे, खेळपट्टीवर टिकून राहून नवीन चेंडू जुना करणे, उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह हाणताना आपल्या फटक्यांत संतुलन राखणे व काळजीपूर्वक चेंडू सोडून देणे महत्वाचे आहे.
आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत राहुलने 218 सामन्यांमधील 254 डावांमध्ये 39.73 च्या सरासरीने 8,940 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 19 शतके आणि 58 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 199 आहे. तो भारताच्या आतापर्यंतच्या फलंदाजांच्या यादीतील 16 व्या क्रमांकावरील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. उत्कृष्ट तंत्र, संयम आणि विविध प्रकारचे फटके खात्यात असलेला राहुल कसोटींत सर्वांत कमी अपयशी ठरला आहे. त्याने 61 सामन्यांमध्ये आणि 107 डावांमध्ये 35.26 च्या सरासरीने 3,632 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. त्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 199 ही आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 85 सामने आणि 79 डावांमध्ये 49.08 च्या सरासरीने 3,043 धावा केल्या आहेत. त्यात 88.17 इतका त्याचा स्ट्राईक रेट असून सात शतके आणि 18 अर्धशतके समाविष्ट आहेत. टी-20 मध्ये तो भारताचा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 72 सामने आणि 68 डावांमध्ये 37.75 च्या सरासरीने आणि जवळजवळ 140 च्या स्ट्राईक रेटने 2,265 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि 22 अर्धशतके आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियातील खराब गेलेल्या 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 खेळलेला नाही.
चालू मालिकेत राहुलने तीन सामने आणि सहा डावांमध्ये 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 137 या सर्वोत्तम धावसंख्येसह दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो मालिकेतील चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या मालिकेतून इंग्लंडमधील त्याच्या फलंदाजीची सरासरी खूपच सुधारली असून ती 30 च्या घरातून 40 च्या घरात पोहोचली आहे.









