वृत्तसंस्था/ हैदराबाद
‘बीआरएस’च्या नेत्या के. कविता यांनी बुधवारी पक्ष आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला. अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली बीआरएसमधून निलंबित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी के. कविता यांनी पत्रकार परिषदेत घेत भाऊ आणि पक्ष नेते केटी रामा राव (केटीआर) यांना चुलत भाऊ हरीश राव आणि संतोष राव यांच्यावर विश्वास ठेवू नका असा इशारा दिला. या दोघांमुळेच सीबीआय अधिकारी आपले वडील आणि पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची चौकशी करत आहेत. तसेच हे नेते वैयक्तिक फायद्यासाठी कुटुंब तोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कविता यांनी 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत पक्षाच्या सहकाऱ्यांवर केसीआरची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, केसीआर यांनी 2 सप्टेंबर रोजी कविता यांना पक्षातून निलंबित केले. कविता 2014 ते 2019 पर्यंत निजामाबादमधून लोकसभा खासदार होत्या. मागील बराच काळ त्यांचे भाऊ केटी रामा राव आणि चुलत भाऊ टी हरीश राव यांच्यात पक्ष नेतृत्वावरून वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या.









