वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ईडीनंतर आता सीबीआयनेही मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी के. कविता यांच्यावर कारवाई केली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआयने शनिवारी त्यांची 6 तास चौकशी केली होती. त्यानंतर आता गुऊवारी तिहार तुऊंगातून के. कविता यांना अटक केली. सीबीआयने केलेल्या कारवाईनंतर आता शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर सीबीआय रिमांडची मागणी करण्यात येणार आहे. कविता 26 मार्चपासून तिहार तुरुंगात असून ईडीने त्यांना 15 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील घरातून अटक केली होती. 16 मार्च रोजी कविता यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 23 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी 26 मार्चपर्यंत वाढवली होती. 26 मार्च रोजी कविता यांना न्यायालयीन कोठडीत तिहारला पाठवले होते. 9 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली होती. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने न्यायालयाला पूर्वकल्पना देत तिहार मध्यवर्ती कारागृहामध्ये कविता यांची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. 5 एप्रिल रोजी न्यायालयाने सीबीआयला कविता यांची तुऊंगात चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्या आदेशाला कविता यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. तसेच याआधी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.