केरळच्या माजी आरोग्यमंत्री ः पक्षाच्या भूमिकेमुळे घेतला निर्णय
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळच्या माजी आरोग्यमंत्री आणि माकपच्या वरिष्ठ नेत्या के.के. शैलजा यांनी प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मॅगेसेस पुरस्कार समितीकडून आपल्याला एक पत्र मिळाले होते. परंतु पक्षाच्या सदस्य नात्याने केंद्रीय समितीसोबत चर्चा केली आणि पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे शैलजा यांनी सांगितले आहे. पक्षानेच मॅगसेसे पुरस्कार स्वीकारण्यास मनाई केली आहे का हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
केरळच्या आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी निपाह विषाणू अन् कोरोना विषाणू संकटाच्या विरोधातील लढाईत मोठी भूमिका बजावली होती. निपाह अन् कोरोना विषाणूचे सर्वप्रथम संक्रमण केरळमध्येच दिसून आले होते. तरीही शैलजा यांच्या नेतृत्वाखाली केरळने या दोन्ही विषाणूंच्या विरोधातील लढाई प्रभावीपणे लढली होती. मॅगसेसे पुरस्कार समितीने शैलजा यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आल्याचे त्यांना ईमेलद्वारे कळविले होते.
माकपमध्ये निर्णयावरून नाराजी
के.के. शैलजा या सरकारकडून सोपविण्यात आलेल्या जबाबदारी पार पाडत होत्या. याचमुळे वैयक्तिक स्वरुपात त्यांनी याचे श्रेय घेऊ नये असे माकपचे मानणे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. माकपच्या या निर्णयामुळे काही नेते नाराज असल्याच्लोही समजते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे स्वतःच्या व्यतिरिक्त कुणालाच प्रसिद्धीच्या झोतात पाहू शकत नाहीत. या निर्णयाचा पक्षाला पश्चाताप करावा लागणार असल्याचे संजीव थॉमस यांनी म्हटले आहे.
आशियाचा नोबेल
मॅगसेसे पुरस्कार हा आशियात निस्वार्थ सेवा करणाऱया लोकांना देण्यात येतो. मॅगसेसेला आशियाचा नोबेल देखील म्हटले जाते. हा पुरस्कार फिलिपाईन्सचे माजी अध्यक्ष रेमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान केला जातो. 1957 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.









