वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे माघारी फिरवावे लागण्याची घटना सोमवारी घडली. तेलंगणा निवडणुकीसंदर्भात प्रचारसभा घेण्यासाठी केसीआर देवरकदरा येथे जात होते. याचदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला टेक ऑफ केल्यानंतर 10 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसवर परतावे लागले. सतर्क पायलटने हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसकडे वळवले आणि ते सुरक्षितपणे उतरवल्याचे सांगण्यात आले. केसीआर यांच्यासाठी दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. काही वेळातच फार्महाऊसवर दुसरे हेलिकॉप्टर दाखल झाल्यानंतर केसीआर आपल्या नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून सध्या केसीआर यांच्यासह सर्वच पक्षांचे स्टार नेते प्रचारात व्यग्र असल्याचे दिसून येत आहेत.









