पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणाना सरकारवर टिका केली. भारत राष्ट्र समिती यांनी शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने मोडीत काढली असून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हैदराबाद महापालिका निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सामील होणार होते पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला असल्याचा खुलासाही पंतप्रधानांनी केला.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी राजकारण आतापासूनच तापत आहे. भाजपच्या केंद्रिय नेर्तृत्वाकडून तेलंगणात अनेक रॅली आयोजित केल्या जात आहेत. तेलंगणातील निजामाबाद येथे रॅलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरात टीका केली. ते म्हणाले, “भारत राष्ट्र समितीने शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने मोडली आहेत. पण भाजपने निजामाबादमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. यासाठी तेलंगणामध्ये राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना करणार आहे.” असे आश्वासनही त्यांनी दिले.
या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकल्या तेव्हा केसीआर यांना समर्थनाची गरज होती. त्या निवडणुकांपुर्वी ते माझे विमानतळांवर स्वागत करायचे, पण अलिकडे ते येत नाहीत. त्यानंतर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर केसीआर दिल्लीत मला भेटायला आले. त्यांनी माझ्याजवळ एनडीएमध्ये सामील व्हायची इच्छा व्यक्त करून हैद्राबाद महानगरपालिकेसाठी पाठिंबा मागितला. पण मी चंद्रशेखर राव यांना स्पष्ट सांगितले की, त्यांनी पुर्वी केलेल्या चुकांमुळे त्यांना पाठींबा देऊ शकत नाही.”
भारत राष्ट्र समिती (BRS) ने पंतप्रधान मोदींचा दावा फेटाळून लावताना हे धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. BRS नेते खलीकुर रहमान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी खोटे बोलून कुठल्याही खालच्या पातळीवर जाऊ शकतात. पुढच्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेट देतील तेव्हा त्यांनी कॅमेरा सोबत घ्यावा.”