विविध कार्यक्रम, महाप्रसादाचे वितरण
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील दादा अष्टेकर व भक्त मंडळाच्यावतीने कार्तिकोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी जलाभिषेक, होमहवन, नवग्रह पूजन आणि सत्यनारायण पूजा करण्यात आली. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी मंदिरात अष्टेकर दाम्पत्याच्या हस्ते नवग्रह पूजन करण्यात आले. नाना अष्टेकर व पूजा अष्टेकर दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यावेळी 65 नद्यांचा जलाभिषेक जोतिबा मूर्तीवर करण्यात आला. यावेळी सचिन जोशी यांनी पौरोहित्य केले. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी मंदिरात गोंधळ घालून जागर करण्यात आला. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्तिकोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात जोतिबाची मूर्ती सजविण्यात आली होती. शिवाय मंदिरावर विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहावयास मिळाला. या उत्सवाची सुरुवात प. पू. दादा अष्टेकर महाराज यांनी केली. उत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष होते. रात्री 8 नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी भक्त मंडळी आणि नागरिक उपस्थित होते.









