वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंध्रप्रदेशची 22 वर्षीय महिला धावपटू ज्योती यर्राजीने गेल्या दोन आठवडय़ाच्या कालावधीत महिलांच्या 100 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत तिसऱयांदा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे.
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या डी. हॅरी स्कुलटिंग क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 100 मी. अडथळय़ांच्या शर्यतीत 13.04 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम केला. गेल्या रविवारी ब्रिटनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने महिलांची 100 मी. अडथळय़ाची शर्यत जिंकताना 13.11 सेकंदाचा अवधी घेत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. हा राष्ट्रीय विक्रम ज्योतीने पुन्हा मोडीत काढला आहे. गेल्या महिन्यात कोझिकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने 13.09 सेकंदाचा अवधी घेत या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.









