वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)
शनिवारी येथे झालेल्या 2025 च्या विश्वचषक स्टेज-4 तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू ज्योती व्हेनामने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात 3 पदकांची कमाई केली. 2025 च्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची मोहिम चांगलीच यशस्वी ठरली असून त्यांनी या स्पर्धेतील 4 टप्प्यांमध्ये 3 सुवर्णपदकांसह एकूण 14 पदके मिळवली.
माद्रीदच्या चौथ्या टप्प्यातील स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन ज्योती सुरेखा व्हेनामने महिलांच्या वैयक्तिक कम्पाऊंड प्रकारात रौप्यपदक पटकाविले. ज्योतीचे सुवर्णपदक केवळ एका गुणाने हुकले. ब्रिटनच्या इला गिब्सनने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविताना ज्योतीचा 148-147 असा पराभव केला.
महिलांच्या सांघिक कम्पाऊंड तिरंदाजी प्रकारात ज्योती सुरेखा व्हेनाम, परणीत आणि 16 वर्षीय प्रतिकाने रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात चीन तैपेईने सुवर्णपदक घेतले. ज्योतीने भारताच्या पदक तक्त्यात आघाडीचे स्थान कायम राखले. मिश्र सांघिक कम्पाऊंड तिरंदाजी प्रकारात ज्योतीने ऋषभ यादव समवेत कांस्यपदक मिळविले. मात्र दीपिकाकुमारी, तरुणदीप राय, धीरज बुमदेवरा आणि अंकिता भक्त यांची कामगिरी निराशाजनक झाली.









