वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आलेल्या महिला युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला. 33 वर्षीय ज्योती मल्होत्रा ही उत्तर भारतात कार्यरत असलेल्या संशयित हेरगिरी नेटवर्कचा भाग असल्याचे म्हटले जाते. सध्या तिची पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी तिला अटक केली. सुरुवातीला तिला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर 22 मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर तिला चार दिवसांच्या अतिरिक्त कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.









