क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरीक सेवा जलतरण स्पर्धेसाठी बेळगावच्या जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी (कोरवी) यांची कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे.
बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरिय नागरीक सेवा जलतरण स्पर्धेत ज्योती होसट्टी यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कडोली येथील प्रथमिक आरोग्य केंद्राच्या रुजू असलेल्या ज्योती होसट्टी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत 200 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. बॅकस्ट्रोक या दोन स्पर्धेत सुवर्ण तर 100 मी. बटरफ्लाय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या जलतरण तलावात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची कर्नाटक संघात त्यांची निवड करण्यात आली आहे. ज्योती यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.









