फिनिक्स चषक 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सील आयोजित बारावी फिनिक्स चषक 17 वर्षाखालील आंरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ज्योती सेंट्रल संघाने अंगडीचा, मराठी विद्यानिकेतनने भातकांडेचा फिनिक्सने शेख सेंट्रलचा, कॅन्टोमेटने केएलएसचा, पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला. भरतेश संघ न आल्याने विजया संघाला पुढे चाल देण्यात आली. फिनिक्स होनगा मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ज्योती सेंट्रल संघाने अंगडी संघाचा 3-1 असा पराभव केला. सामन्याच्या 12 व 17 व्या मिनिटाला ज्योती सेंट्रलच्या स्वप्नीलने 2 गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 27 व्या मी. अंगडीच्या समीरने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 35 व्या मि. स्वप्नीलच्या पासवर शाबादने तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात भरतेश संघ न आल्यामुळे विजया संघाला पुढे चाल देण्यात आली.
तिसऱ्या सामन्यात मराठी विद्यानिकेतनने भातकांडे संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला विद्यानिकेतनच्या शिवराजच्या पासवर अनिकेतने पहिला गोल केला. तर दुसऱ्या सत्रात अनिकेतच्या पासवर शिवराजने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मराठी विद्यानिकेतनला मिळवून दिली. चौथ्या सामन्यात फिनिक्स होनगाने शेख सेंट्रलचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला फिनिक्सच्या रूद्र पाटीलच्या पासवर फईमने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मि. ला शेख सेंट्रलच्या बचाव फळीतील खेळाडूच्या हाताला चेंडू लागल्याने पंचाने फिनिक्सला पेनाल्टी बहाल केली. त्याचा फायदा उठवत फिनिक्सच्या रूद्र पाटीलने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात कॉन्टोमेटने केएलएसचा 4-0 असा पराभव केला. सामन्याच्या 13 व 21 व्या मि.ला कॅन्टोमेटनच्या अनुशने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 31 व 37 व्या मिनिटाला अफताबने 2 गोल करून 4-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली आहे.









