आग्रा बटाटा, इंदूर बटाटा, हासन बटाटा-कांदा भाव क्विंटलला स्थिर : टोमॅटो-कोथिंबीरचे दर वाढले; महाराष्ट्र कांदा आवक सुरू
सुधीर गडकरी /अगसगे
गणेशचतुर्थी सण असल्यामुळे शनिवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये जवारी बटाटा, रताळ्याचा भाव प्रतिक्विंटल 500 रुपयांनी वधारला आहे. तर भाजीमार्केटमध्ये सर्व भाजीपाल्यांचे दर किंचित प्रमाणात वाढले आहेत. आग्रा बटाटा, इंदूर बटाटा, हासन बटाटा आणि कांदा भाव क्विंटलला स्थिर आहेत. टोमॅटो आणि कोथिंबीरचे दर वाढले आहेत. गणेशचतुर्थीच्या तोंडावरच भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गोवा राज्यातून भाजीपाला आणि जवारी बटाट्याला मोठ्याप्रमाणात मागणी आल्याने दर वाढले आहेत.
बुधवारपासून बेळगाव जवारी बटाटा विक्रीसाठी मार्केटयार्डमध्ये दाखल झाला आहे. सध्या लाल जमिनीतील आणि मसार जमिनीतील बटाटा ए.पी.एम.सी. मध्ये जवारी बटाटा आवक येण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी 67 पोती आवक दाखल झाली होती. तर शनिवारी सुमारे 500 पोती जवारी बटाटा आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. पाऊस नसल्यामुळे सध्या गोळी, मीडियम व मोठवड आकाराचा बटाटा बाजारात येत आहे. गोळा (मोठा) बटाटा होण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. यामुळे यंदा गोळा बटाटा मिळणे अशक्य आहे. मंगळवारी गणेशचतुर्थी असल्यामुळे गोवा आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये जवारी बटाट्याला अधिक मागणी असते. गणपतीला नैवैद्य म्हणून पुरणपोळी, मोदक व बटाटा भाजी दाखवण्यात येते. ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यामुळे बटाटा भाव वाढला आहे. बुधवारी जवारी बटाटा भाव 500 ते 2500 प्रतिक्विंटल झाला होता. तर शनिवारी बाजारात जवारी बटाटा भाव 700 ते 2800 रुपये झाला. रताळ्याची 450 पोती आवक मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी दाखल झाली होती. साधी आणि मलकापुरी रताळ्याचीही आवक आली होती. ही रताळी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी जात आहेत. रताळ्याच्या आवकेत गणेशचतुर्थीनंतर वाढ होणार आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
भाजीपाला भावात वाढ
गोवा राज्यामध्ये काही ठिकाणी भाजीपाल्यांचे हार करून गणपतीला अर्पण करतात आणि यावेळी भाजीपाल्यांचे सेवन मोठ्याप्रमाणात करतात. तसेच ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करतात. यावेळी मांसाहार जेवण वर्ज्य करतात. परिणामी भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तर भाजीपाला आवक घटप्रभा परिसरातून कमी प्रमाणात येत आहे. आग्रा बटाटा, इंदूर बटाटा व महाराष्ट्र कांदा आणि कर्नाटक कांद्याची आवक होत आहे. मागणीनुसार आवक होत आहे. यामुळे भाव क्विंटलला स्थिर आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर किरकोळ भाजीपाला बाजार तेजीत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आठवडी बाजार तेजीत असल्याचे पहायला मिळाले. विविध साहित्यांबरोबर भाजीपाल्याची खरेदीदेखील वाढली होती. मात्र काही भाज्यांचे दर पुन्हा हळुहळू वाढू लागले आहेत. तर काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. विशेषत: काकडी, गाजर, कडीपत्ता आणि भोपळा देखील मोठ्याप्रमाणात दाखल झाला आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात कोबी 10 रुपयाला एक नग, फ्लॉवर 20 रु. एक नग, बटाटा 30 रु. किलो, कांदे 30 रु. किलो, टोमॅटो 20 रु. किलो, गवार 50 रु. किलो, गाजर 50 रु. किलो, बिन्स 40 रु. किलो, ओलिमिरची 60 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला एक पेंडी, काकडी 60 रु. किलो, कोथिंबीर 20 रुपयाला एक पेंडी, लालभाजी 10 रुपयाला दोन, कांदापात 20 रुपयाला सहा पेंड्या, शेपू 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन पेंड्या, पालक 20 रुपयाला चार पेंड्या, मेथी 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन असा भाजीपाल्याचा दर आहे.
गणेशोत्सव तोंडावर आल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीबरोबर किरकोळ भाजीपाल्याची खरेदी होऊ लागली आहे. विशेषत: काकडी, ओलीमिरची, गाजर, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटा, वांगी, आदी भाज्यांची खरेदी वाढली आहे. बाजारात बटाटा, काकडी आणि वांग्याची आवकही वाढली आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात हळूहळू गर्दी वाढत आहे. गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी खरेदीला वेग आला आहे. त्याचबरोबर किरकोळ भाजीपाला बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. गणेशोत्सव काळात विविध भाज्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आवक देखील वाढत असून खरेदीलाही पसंती दिली जाते.









