चिपळूण :
पूरबाधित म्हणून प्रशासनाकडे नोंद असलेल्या मिरजोळी-जुवाडबेटावरील काही ग्रामस्थांना गेल्या २० वर्षांपासून पथदीपांअभावी अंधारात चाचपडावे लागत आहे. केवळ वायर जोडणे इतकेच काम शिल्लक असतानाही मागणी करुनही महावितरण व ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जुवाड बेटावर गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ रहात असून गावातील बहुतांशी शेती याच भागात आहे. काही वर्षे मागे जाता या भागात जाण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीवर पूल बांधला. त्यामुळे ग्रामस्थांचा येण्या-जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या बेटावर माळी समाजाची १४ घरे व २३ कुटुंबे, बौद्ध समाजाची २ घरे व ५ कुटुंबे आहेत. मात्र ती सोयी-सुविधांपासून वंचितच राहिली आहेत.
येथे विजेची व्यवस्था पूर्वीपासून आहे. मात्र २००५ साली महापूर आल्यानंतर काही कारणांनी नदीच्या पलिकडून असणारी बौद्ध समाजाच्या घरांकडील पथदीपांची वायर काढून ठेवण्यात आली, ती आजतागायत जोडण्यात आलेली नाही. ती महावितरण का जोडत नाही याची कारणे अद्यापही देण्यात आलेली नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व महावितरणकडे पत्रव्यवहार व सातत्याने भेटीगाठी घेतल्या असतानाही या पूरबाधित भागाकडे इतके दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पथदीपांसाठी असलेल्या विद्युत तारांवर इतकी झाडी आली आहे की तिची साफसफाई करताना महावितरण कर्मचाऱ्यांच्या नाकीदम येणार आहे.
- .. तर उपोषण करणार
याबाबत माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते, जुवाडबेटावरील ग्रामस्थ अनिल माळी म्हणाले की, पथदीप सुरू करावेत म्हणून इतकी वर्षे आम्ही मागणी करीत आहोत. मात्र ग्रामपंचायत व महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता आम्हाला नाईलाजास्त उपोषण करावे लागणार आहे.
- माहिती घेऊन कार्यवाही
जुवाड बेटावरील पथदीप बंद असल्याचे मला ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे याची माहिती घेऊन शक्य ती कार्यवाही केली जाईल.
– अर्जुनकुमार मोहिते, सहाय्यक अभियंता महावितरण, चिपळूण








