वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आग विझवताना घरात नोटांचे गठ्ठे सापडल्याच्या कथित वृत्तामुळे चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचे नाव पूर्वीही सीबीआय आणि ईडीने तपास केलेल्या प्रकरणात आले होते, अशी माहिती प्रसिद्ध होत आहे. मात्र, गेल्यावर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातून क्लिनचिट दिली होती.
शुक्रवारी न्या. वर्मा यांच्या निवासस्थानाला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ती आग विझविण्यात आली. मात्र ती विझविताना त्यांच्या निवासस्थानाच्या एका खोलीत प्रचंड प्रमाणात नोटांचे गठ्ठे आढळून आल्याचे वृत्र शुक्रवारी दुपारभर प्रसिद्ध करण्यात येत होते. तसेच त्यांची या प्रकरणामुळे ताबडतोब बदली करण्यात आली आहे, असेही वृत्त दिले जात होते. तथापि, संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बदली केल्याच्या वृत्ताचा पूर्णत: इन्कार केला होता. तसेच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा आढळल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला होता. तरीही या वृत्ताची चर्चा शनिवारीही होत होती.
न्या. वर्मा न्यायालयापासून दूर
शनिवारी न्या. वर्मा न्यायालयीन कामकाजापासून दूर राहिल्याचे दिसून आले होते. या प्रकरणातले नेमके सत्य बाहेर येण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल अशी चर्चा आहे. त्यांच्या विरोधात विभागांतर्गत चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. तथापि, त्यांच्या घरात पैशाचा प्रचंड साठा आढळला होता की नव्हता, ही बाब स्पष्ट झाल्याशिवाय कारवाई होणार नाही, असे दिसून येते.









