भूषण गवई यांच्याकडून केंद्र सरकारला शिफारस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे आगामी सरन्यायाधीश होणे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी केंद्र सरकारला न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर 2025 रोजी देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांनी चालूवर्षी 14 मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. आता त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे शिफारस केले आहे. कायदा मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सरन्यायाधीशांना पत्र पाठवून नवीन सरन्यायाधीशाचे नाव कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.









