न्या. महेश सोनक : मनोहर सिनाई उसगावकर यांना पणजीत श्रद्धांजली
पणजी : कायदा क्षेत्रातील महामेरू, कायदेतज्ञ माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनोहर सिनाई उसगावकर यांनी न्यायदानाचे काम करताना न्याय, निती आणि भारतीय घटनेला प्रमाण मानून कर्तृत्व सिद्ध केले. त्यांचे कायदा क्षेत्रातील योगदान आणि कार्य हे अतुलनीय आहे. त्यांच्यासारखी महान व्यक्ती गोव्यात जन्माला आली, हे या राज्याचे भाग्य. त्यांनी पोर्तुगीज काळातील कायदा इंग्रजी भाषेत भाषांतर केल्याने त्याचा उपयोग आज केवळ गोव्यालाच नव्हे, तर भारताला होत आहे. त्यामुळे मनोहर उसगावकर हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे योगदान व त्यांनी निर्माण केलेले वकील हे त्यांचे कार्य पुढे घेऊन जातील, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक यांनी काढले.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात स्व. मनोहर सिनाई उसगावकर यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, राज्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम, अॅङ अवधूत सलत्री, इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब तर उपस्थितांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, उद्योगपती श्रीनिवास धेंपो आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, स्व. मनोहर सिनाई उसगावकर यांनी न्यायदानाचे काम करत असतानाच नवीन कायदे करण्यासाठी नेहमीच सरकारला आवश्यक मार्गदर्शन करण्याबरोबरच मदतही केली. त्यांनी गोवा मुक्तिनंतर न्यायप्रक्रियेत दिलेले योगदान हे फार मोठे आहे. पोर्तुगीज भाषेतील कायदे त्यांनी इंग्रजीत भाषांतर करून दिल्यानेच गोवा मुक्तिनंतर त्याचा सरकारला लाभ झाला. त्यांचे योगदान हे न विसरण्याजोगे असल्याने त्यांच्या न्यायव्यवस्थेतील कार्याची सरकार नेहमीच आठवण ठेवेल.
अॅङ रमाकांत खलप म्हणाले, स्व. मनोहर सिनाई उसगावकर हे आगळ्या-वेगळ्या अशा गुऊकुलाचे संस्थापक होते. त्यामुळेच न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेक वकील निर्माण झाले. त्यांचा शिष्य परिवार फार मोठा आहे. स्व. मनोहर उसगावकर म्हणजे ज्ञानदानाचे विद्यापीठ होते. गोव्यातील जमीन-हक्क संबंधातील कायदा देशाने अभ्यासावा, यावर ते आग्रही होते. त्यामुळे ज्यावेळी कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मी तशा स्वऊपाचा कायदा आणि त्या कायद्याचे प्राऊप ‘लॅण्ड टायटलींग बिल’ या नावाने तत्कालीन सरकारला सादर केले. न्याय, निती आणि भारतीय घटना यांचेच दायित्व मानून नेहमी कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर उसगावकर होत. मित्र-मंडळींचा लाडका, मुला-बाळांबरोबरच शिष्यांमध्ये रमणारा, कायद्यातील मेऊमणी हरपल्याने गोव्याचे नुकसान झाल्याच्या भावनाही खलप यांनी व्यक्त केल्या.
देविदास पांगम यांनी सांगितले की, राज्याचे माजी अतिरिक्त महाधिवक्ता मनोहर सिनाई उसगावकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचा पोर्तुगीज ते इंग्रजी भाषातील प्रवास हा वाखाणण्याजोगा होता. पोर्तुगीज काळातील दस्तावेज व त्या काळातील कायदे समजावेत यासाठी त्यांनी स्वत: पोर्तुगीज कायदे इंग्रजीत भाषांतर करून त्यांची पुस्तके काढली. विविध विद्यालये, महाविद्यालये आदी ठिकाणी व्याख्याने दिली. वकीली क्षेत्रात नवख्या सवंगड्यांना त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभायचे. त्यांनी उच्च प्रतीचे वकील निर्माण करण्याबरोबरच न्यायदानासाठी दिलेले योगदान हे फार मोठे आहे. त्यांच्या कायद्यातील ज्ञानाचा फायदा हा केवळ गोव्यालाच नव्हे, तर देशालाही झालेला आहे. इतक्या उंचावर जाऊनही त्यांनी कधीच अभिमान बाळगला नाही. ते जीवनाच्या शेवटपर्यंत न्यायदानासाठी आग्रही राहिले. त्यामुळे न्यायव्यवस्थेत त्यांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही, अशा शब्दांत पांगम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांमध्ये राज्यातील बार कौन्सिलचे अध्यक्ष झीलमन परैरा, म्हापसा बार कौन्सिल संघटनेचे अध्यक्ष अॅङ परेश राव, सचिन मेंडसे आदींनी आपल्या भावना व्यक्त करून अॅङ मनोहर सिनाई उसगावकर यांच्यानिधनानिमित्त दु:ख व्यक्त केले. अॅङ उसगावकर यांच्या निधनानिमित्त दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी अॅङ मनोहर सिनाई उसगावकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहिली. अॅङ अवधूत सलत्री यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.









