वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या सरन्यायाधीशपदी न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मंगळवारी संमती दिली आहे. ते 14 मे पासून देशाच्या सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळतील, असा आदेश राष्ट्रपती भवनाकडून काढण्यात आला आहे. 14 मे या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपथची शपथ देवविणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
मावळते सरन्यायाधीश न्या. संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची सूचना प्रथेप्रमाणे केली होती. केंद्र सरकारनेही त्यांच्या नावाला संमती दिली होती. आता राष्ट्रपतींनी त्यांच्या नावाला संमती दिल्याने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. न्या. भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जातील. त्यांचा कालावधी साधारणत: सहा महिने तीन आठवड्यांचा असेल. मावळते सरन्यायाधीश न्या. संजीव खन्ना हे 13 मे या दिवशी निवृत्त होत आहेत. न्या. भूषण गवई यांच्यानंतर न्या, सूर्यकांत हे सरन्यायाधीश होणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे.









