पैसा खर्च करणे हे अनेकांना त्यांच्या जीवावरचे दुखणे वाटते, हे आपल्याला माहीत आहे. अशी माणसे समाजात ‘चिक्कू’ म्हणून ओळखली जातात. पैशाची उधळपट्टी करणे तर सोडाच, पण स्वत:च्या अत्यावश्यक आवश्यकता भागविण्यासाठीही असे लोक कमीत कमी पैसा खर्च करण्याचा प्रयत्न करतात. कित्येकता या सवयीमुळे लोक त्यांना हसतात. पण ते ही सवय सोडत नाहीत. काही जणांना मात्र, त्यांच्या गरीबीमुळे हा ‘चिक्कू’पणा करणे भाग पडते. स्विट्झरलंडमध्ये वैद्यकीय विषयात डॉक्टरेट करणाऱ्या एका विद्यार्थ्याची सध्या यासंदर्भात चर्चा होत आहे. हा विद्यार्थी चीनी आहे. तो गरीब कुटुंबात जन्माला आलेला आहे. स्विट्झरलंड येथे शिक्षणाचा खर्च मोठा आहे. तरीही येथे शिक्षण चांगले मिळते यासाठी या विद्यार्थ्यांने या देशाची निवड केली आहे.
पैसे वाचविण्यासाठी हा विद्यार्थी ‘कॅटफूड’चे, अर्थात मांजरांसाठी जे खाणे विकत मिळते त्याचा उपयोग करीत आहे. हे खाणे प्रथिनयुक्त असते. तसेच ते माणसांच्या नेहमीच्या खाण्यापेक्षा स्वस्त असते. त्यामुळे गेले अनेक महिने हा विद्यार्थी हे मांजरांचे खाणे खाऊन आपले पोट भरत आहे. तसेच आपल्या शरीराची प्रथिनांची आवश्यकता भागवत आहे. या विद्यार्थ्याने चीनमध्ये त्याच्या उच्च शिक्षणासाठी पै पै साठवून 34 लाख रुपयांची सोय केली होती. तथापि. इतके पैसेही स्विट्झरलंडसारख्या देशात पुरेसे नव्हते. त्यामुळे आपला खर्च वाचविण्यासाठी त्याने हा विचित्र मार्ग शोधला असून त्याने स्वत:ची ही माहिती उघड केली आहे.









