उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा
पणजी : परराज्यातील एकाद्या बालकाचा गोव्यात जन्म झाला म्हणून गोव्यात त्याचे नाव बदलता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्या. भारती डांगरे आणि न्या. आशिष चव्हाण यांनी दिला आहे. मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेले दीपक आणि स्वेता चौरासिया यांनी आपल्या मुलीला गोव्यात जन्म दिला. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव बदलण्यासाठी गोवा राज्य जन्म आणि मृत्यू निबंधकाकडे अर्ज केला असता तो नाकारण्यात आला. त्यावर त्यांनी वास्को येथील दिवाणी न्यायालयात अपील केले असता तेथेही त्यांचा अर्ज फेटाळल्याने तेथेही अपयश आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
या प्रकरणी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी, न्यायालयाने मुलीचा जन्म आणि नोंदणी गोव्यात झाली असली तरी तिचे एकादे पालक अथवा आजी-आजोबा राज्यात जन्मले नसेल, तर ’गोवा नाव आणि आडनाव बदल कायदा-1990’ नुसार गोव्यात त्याच्या नावात बदल करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. याचिकादाराच्या वकिलाने वाद घालण्याचा प्रयत्न केला असता, तो रोखून एकतर कायद्यानुसार पुरावे सादर करा अथवा सदर कायद्याला आव्हान द्या, अशी सूचना न्यायालयाने केली. त्यामुळे सदर याचिका फेटाळली जाण्याची शक्यता ओळखून वकिलांनी याचिका मागे घेणे पसंत केले.









