दर आठवड्याला मिळणार 3.5 लाख रुपये
जगात एकाहून एक अजब जॉब्सबद्दल तुम्ही ऐकले असेल, परंतु एक नोकरी अत्यंत जबरदस्त आहे, तुम्हाला गेम खेळण्याचा छंद असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम नोकरी असून पगारही मोठा आहे. या नोकरीत दर आठवड्याला 3.5 लाख रुपये मिळणार आहेत. या नोकरीच्या अंतर्गत केवळ ऑफिसमध्ये जाऊन गेम खेळावा लागणार आहे. तेदेखील आठवड्यातील केवळ 4 दिवस आणि दिवसातील केवळ 4 तासापर्यंत गेम खेळावे लागणार आहेत. ग्लोबल टॉय आणि एंटरटेन्मेंट कंपनी मॅटल स्वत:च्या पहिल्या युएनओ प्लेअरचा शोध घेत आहे. याकरता अर्ज मागविण्यात आले आहेत. जर तुम्ही युएनओ प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. यात युएनओ क्वाट्रो गेम खेळावा लागेल आणि चाहत्यांना याच्या नियमांबद्दल सांगावे लागणार आहे.

याकरता कंपनी दर आठवड्याला 4,444 डॉलर्स देणार आहे. या नोकरीसाठी निवडल्या जाणाऱ्या क्यक्तीला न्यूयॉर्कच्या ऑफिसमधून काम करावे लागणार आहे. कंपनीने या पदासाठीच्या पात्रतेचे काही निकष जाहीर केले आहेत. संबंधित व्यक्तीचे वर्तन इतरांशी मिळून-मिसळून राहणारे असावे. तसेच त्याला यूएनओ गेम खेळता यावा तसेच त्याचे वेड असणे आवश्यक आहे. गेमदरम्यान त्याला अनेक अनोळखी लोकांशी संपर्क साधावा लागणार आहे. अनोळखी लोकांना गेम खेळण्यासाठी आमंत्रित करावे लागेल आणि नियम समजावून सांगावे लागणार आहेत.
मॅटलचे उपाध्यक्ष आणि गेम्सचे जागतिक प्रमुख रे एडलर यांच्याकडून या नोकरीविषयक पत्रक जारी करण्यात आले आहे. यूएनओसोबत लोकांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. याच्याच अंतर्गत एक नवा पुढाकार हाती घेण्यात आला आहे. यावेळी आम्ही काही तरी नवे करणार आहोत आणि लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा आहे. नोकरीसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात, असे एडलर यांनी सांगितले आहे.









