वृत्तसंस्था / लुसाने
28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे होणाऱ्या स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्याने ओमान पुरूष ज्युनियर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची जागा घेईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) बुधवारी दिली.
गेल्या वर्षी आशिया ज्युनियर कपमध्ये त्यांच्या संघाने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्यानंतर, पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला (एफआयएच) आगामी एफआयएच हॉकी पुरूष ज्युनियर वर्ल्डकप तामिळनाडू 2025 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण स्वीकारले नसल्याचे सुचित केल्यानंतर, ओमानचा पुरूष ज्युनियर संघ आता 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान भारतातील चेन्नई आणि मदुराई या शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सहभागी संघांच्या यादीत सामील होईल, असे एफआयएचने एका निवेदनात म्हटले आहे.
ओमान कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप (ज्युनियर आशिया कप 2024) मध्ये पुढील सर्वोच्च स्थानावर असलेला संघ म्हणून सामील झाला आहे, जी पात्रता स्पर्धा होती. पहिल्यांदाच एफआयएच हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025, महिला आणि पुरूष, मध्ये प्रत्येकी 24 संघांचा समावेश असेल. ज्यामुळे एफआयएच स्पर्धांमध्ये अधिक प्रवेश मिळेल. जो एफआयएच सक्षमीकरण आणि सहभागी धोरणांच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे, असे एफआयएचने निवेदनात पुढे म्हटले आहे.
भारत, चिली आणि स्वित्झर्लंडसह ओमानला गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. यावर्षी 29 ऑगस्ट ते 7 डिसेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे झालेल्या पुरूषांच्या आशिया कपनंतर पाकिस्तानने माघार घेतलेली ही भारतातील दुसरी स्पर्धा आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान हॉकी फेडरेशन (पीएचएफ) तटस्थ ठिकाणी स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दर्शविली आहे, जी एफआयएचने नाकारली.









