वृत्तसंस्था/चेन्नई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये होणार आहे. दरम्यान गुरूवारी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हस्ते या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेच्या लोगो अनावरण समारंभाला उपमुख्यमंत्री स्टॅलिन तसेच हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग, मेघनाथ रेड्डी व हॉकी क्षेत्रातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तामिळनाडूत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश राहिल. तामिळनाडू राज्याचे अतिरिक्त प्रमुख सचिव अतुल्या मिश्रा, हॉकी इंडियाचे खजिनदार शेखर मनोहरन, हॉकी इंडियाचे सरसंचालक आर. के. श्रीवास्तव यांनी खास उपस्थिती दर्शविली. चेन्नई आणि मदुराई येथे अव्वल दर्जाचे सिंथेटिक टर्फ सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असून या स्पर्धेसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली. तामिळनाडूत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचा ड्रॉ स्वीसमधील लॉसेनी येथे 24 जून रोजी काढण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होणारे 24 संघ 6 गटात विभागले जातील. सदर स्पर्धा भारतात तिसऱ्यांदा भरविली जात आहे.









