वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची 2025 सालातील कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा गुवाहाटीत 6 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवित असून मंगळवारी 25 सदस्यांचा भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघ जाहीर करण्यात आला.
भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघामध्ये दर्जेदार कामगिरीचे सातत्य राखणारे युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा, उन्नती हुडा त्याचप्रमाणे मुलांच्या दुहेरीत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भार्गव राम अरिगेला आणि विश्वतेज गोब्बुरु यांचा समावेश आहे. भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघामध्ये आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या व्हिनेला कलागोठला आणि रक्षिता श्री यांनाही संधी देण्यात आली आहे.
सुहानदिनता चषकासाठी (मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा) 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाईल. त्यानंतर 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान वैयक्तिक गटातील सामने खेळविले जातील. सदर स्पर्धा भारतात होत असल्याने त्याचा लाभ भारतीय कनिष्ठ बॅडमिंटनपटूंना अधिक होईल, अशी आशा अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी व्यक्त केली. भारतीय कनिष्ठ संघामध्ये जागतिक मानांकनातील दोन टॉपसिडेड खेळाडूंचा तसेच अन्य काही अव्वल बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. यापूर्वी भारताने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या स्पर्धेचे यजमानपद 2008 साली भूषविले होते. 2008 च्या भारतात झालेल्या स्पर्धेत सायना नेहवालने सुवर्णपदक मिळविली होती. मुलांच्या एकेरीमध्ये गुरु साईदत्तने कांस्यपदक घेतले होते. आतापर्यंत कनिष्ठांच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 11 पदके मिळविली असून त्यामध्ये चार रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताची तन्वी शर्मा ही कनिष्ठ गटातील मानांकनात पहिल्या स्थानावर आहे. तन्वी शर्माने अमेरिकन सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. उन्नती हुडाने 2022 च्या ओडीशा मास्टर्स आणि 2023 च्या अबुधाबी मास्टर्स टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकाविले होते. अलिकडेच झालेल्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उन्नतीने पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का दिला होता.
गुहाटीमध्ये होणाऱ्या या आगामी कनिष्ठांच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी दोन टप्प्यामध्ये निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा समावेश होता. तन्वी आणि व्हेनेला यांनी आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याने त्यांची गुहाटीमधील स्पर्धेसाठी थेट निवड करण्यात आली. वैयक्तिक एकेरीमध्ये 10 मुले आणि 10 मुलींचा यासंघामध्ये समावेश असून हे भारतीय कनिष्ठ बॅडमिंटनपटू मिश्र सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळतील. व्हेनेला आणि रेशिका ही जोडी मुलींच्या दुहेरीत तर भव्या छाब्रा आणि विष्णू कोडे मुलांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघ : मुले एकेरी (19 वर्षांखालील)- रोनक चौहान, ज्ञाना दत्तु, ललितझुला एच., सुर्याक्ष रावत, मुली एकेरी (19 वर्षांखालील)-तन्वी शर्मा, व्हेनेला कलागोटला, उन्नती हुडा, रक्षिता श्री, मुले दुहेरी (19 वर्षांखालील)-ए.आर. सुमित-भव्या छाब्रा, भार्गवराम अरिगेला-विश्वतेज गोबरु, विष्णू कोडे-मिथिलीश पी. कृष्णन, मुली दुहेरी (19 वर्षांखालील)- व्हेनेला कलागोटला-रेशिका, गायत्री रावत-मानसा रावत, अनया बिस्त-अँजेल पुणेरा, मिश्र दुहेरी(19 वर्षांखालील)- भव्या छाब्रा-विशाखा टोप्पो, सी. लालरेमसेंगा-तारिणी सुरी, विष्णू कोडे-किर्ती मनचला, वनश देव-दियांका वालडिया.









