29 नोव्हेंबरपासून चिलीत होणार स्पर्धा, पहिल्या दिवशी भारताची सलामी कॅनडाविरुद्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेची गटवारी आणि वेळापत्रक संयोजन समितीने गुरुवारी रात्री जाहीर केले असून चिलीतील सांतियागो येथे ही स्पर्धा 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
रोमांचकता वाढावी यासाठी एफआयएचने कनिष्ठ महिला वर्ल्ड रँकिंगची प्रथमच सुरुवात केली असून या रँकिंगनुसार भारतीय कनिष्ठ महिला संघाला सहावे मानांकन मिळाले आहे तर नेदरलँड्सला पहिले, अर्जेन्टिना, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका यांना दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे मानांकन देण्यात आले आहे. काँटिनेन्टल रँकिंगमध्ये मात्र भारत आशिया विभागात पहिल्या स्थानावर आहे.
कनिष्ठ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाला क गटात स्थान मिळाले असून याच गटात बेल्जियम, कॅनडा, जर्मनी यांचाही समावेश आहे. भारताची सलामीची लढत कॅनडाविरुद्ध 29 नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर 1 डिसेंबरला जर्मनीविरुद्ध व शेवटची साखळी लढत बेल्जियमविरुद्ध 2 डिसेंबर रोजी होईल.
नुकत्याच जपानमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद मिळविल्याने भारताचा कनिष्ठ महिला संघ या स्पर्धेत दुणावलेल्या आत्मविश्वासाने उतरेल आणि ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करेल. मागील वेळेस भारतीय संघाची कांस्यपदक जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली होती. तिसऱ्या -चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारताला इंग्लंडकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.
स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार, प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन संघांविरुद्ध खेळेल आणि अव्वल राहणारे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. उर्वरित संघ क्लासिफिकेशन लढतीत सहभागी होतील. या स्पर्धेत नेदरलँड्स सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. अर्जेन्टिना व दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी दोन वेळा तर जर्मनीने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.
गट अ : ऑस्ट्रेलिया, चिली, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका
गट ब : अर्जेन्टिना, कोरिया, स्पेन, झिम्बाब्वे
गट क : भारत, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी
गट ड : इंग्लंड, जपान, न्यूझीलंड, अमेरिका.









