वृत्तसंस्था/ कॅनबेरा
कनिका सिवाचने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया यू-21 महिला संघावर 1-0 असा विजय मिळविला. या दौऱ्यावरील हा तिसरा सामना होता.
सिवाचने 32 व्या मिनिटाला हा एकमेव गोल नोंदवला. येथील नॅशनल हॉकी सेंटरवर हा सामना खेळविण्यात आला. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिल्यानंतर तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताने गोलकोंडी फोडली. सिवाचने शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले आणि अखेरपर्यंत आघाडी टिकवून ठेवत विजय साकार केला. याआधीच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया यू-21 संघाने भारतावर विजय मिळविले होते. तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असल्याने उर्वरित दोन सामन्यांतही हा जोम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. पुढील दोन सामने ऑस्ट्रेलियातील प्रिमियर हॉकी वन लीगमधील संघ कॅनबेरा चिलविरुद्ध मंगळवारी व गुरुवारी होणार आहेत. या सामन्यानंतर मालिकेची सांगता होणार आहे.









