वृत्तसंस्था/ बेंगळूर
अर्जेन्टिनातील रोजारिओ येथे होणाऱ्या महिलांच्या चौरंगी हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताच्या कनिष्ठ महिला संघ बुधवारी प्रयाण केले. 25 मे ते 2 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
मित्रत्वाची ही स्पर्धा यावर्षी चिलीमध्ये होणाऱ्या एफआयएच महिला कनिष्ठ हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीचा एक भाग आहे. या चौरंगी स्पर्धेत यजमान अर्जेन्टिना, उरुग्वे, चिली व भारत यांचा सहभाग आहे. या प्रत्येक संघाविरुद्ध भारतीय संघ दोन सामने खेळेल. संघाचे मूल्यांकन, विविध कॉम्बिनेशन्सची चाचणी आणि डावपेचात भक्कमपणा आणणे यासाठी या स्पर्धेचा उपयोग केला जाणार आहे. तुषार खांडेकर या महिला संघाचे प्रशिक्षक असून निधी या संघाची कर्णधार आहे तर आघाडीवीर हिना बानो उपकर्णधारपद सांभाळेल.
भारताची सलामीची लढत चिलीविरुद्ध 25 मे रोजी, त्यानंतर उरुग्वे (26 मे), अर्जेन्टिना (28 मे) यांच्याविरुद्ध सामने होतील. याच संघांविरुद्ध आणखी एकेकदा लढती होतील. ‘या चौरंगी स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघ आतुर झाला असून ट्रेनिंगमध्ये आम्ही खूप परिश्रम घेतले आहे. त्याचे प्रतिबिंब आमच्या खेळात दिसून येईल, अशी मला आशा वाटते,’ असे कर्णधार निधी म्हणाली. ‘बलाढ्या संघांविरुद्ध खेळल्याने आमच्यात सुधारणा होण्यास मदतच होणार आहे. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून या स्पर्धेत खेळण्यास आम्ही उत्सक झालो आहोत,’ असेही ती म्हणाली.









