शालार्थ वेतन प्रणालीत नाव समाविष्ठ करुन आदेशासाठी 90 हजारांची लाच
कार्यालयाच्या दारातच केली कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाविद्यालयीन शिक्षिकेचे नांव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ठ करुन आदेशाची प्रत देण्यासाठी 90 हजारांची लाच स्विकारणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ जेरबंद केले. संदिप नारायण सपकाळ (वय 33 रा. एस.एस.सी बोर्ड ऑफिस क्वॉटर्स, मुळ रा. डफळवाडी ता. पाटण, जिल्हा सातारा) असे त्याचे नांव आहे. मंगळवारी दुपारी एस.एस. सी बोर्ड कार्यालयानजिक ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या पत्नीचे नाव शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यासाठीचा प्रस्ताव महाविद्यालयाकडून तयार करुन माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. यानंतर हा प्रस्ताव कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांकडे सादर करण्यात आला. मात्र यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परवानगी मिळत असल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला. यानंतर फिर्यादी यांनी हा प्रस्ताव तयार करुन देण्यासाठी याचे काम पाहणारे कनिष्ठ लिपिक संदिप संकपाळ यांची भेट घेतली. यावेळी संदिप संकपाळ याने शालार्थ वेतन प्रणालीमध्ये नाव समाविष्ठ करुन आदेश देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने मंळवारी सकाळी लाचलुचपत विभागाशी संपर्क करुन याबाबतची तक्रार दिली. यानुसार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराने संदिप संकपाळ याची भेट घेतली असता त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यावेळी लाचेची रक्कम तडजोडी अंती 90 हजार रुपये ठरविण्यात आली. मंगळवारी दुपारीच लाचलुचपत विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आवारात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराने संदीप संकपाळ याच्याशी संपर्क करुन कार्यालयात आलो असल्याचे सांगितले. यानुसार संदीप संकपाळ तक्रारदारास भेटण्यासाठी कार्यालयाच्या दारातील रिंगरोडवर आला.लाचेची 90 हजार रुपयांची रक्कम घेताना संदीप संकपाळ याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ जेरबंद केले.
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, सुनिल घोसाळकर, रुपेश माने, विष्णु गुरव, यांनी ही कारवाई केली.