वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारी व मार्चमध्ये होणाऱ्या यू-17 डच ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन व जर्मन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताने यू-17 संघ जाहीर केला असून राष्ट्रीय चॅम्पियन ज्ञाना दत्तू टी. हा भारताचा प्रमुख आव्हानवीर असेल.
या संघात कनिष्ठ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या रौनक चौहान, आदर्शिनी श्री, डबल्स स्पेशालिस्ट्स भव्या छाब्रा व परम चौधरी यांना स्थान मिळाले आहे. डच ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा हार्लेम, नेदरलँड्स येथे 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार आहे तर जर्मन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा मुलहेम अॅन डर रुहर येथे 5 ते 9 मार्च या कालावधीत होईल. भारतीय पथकात एकेरीसाठी प्रत्येकी चार मुले व मुली, दोन मुले दुहेरीसाठी व दोन मुली दुहेरीसाठी आणि मिश्र दुहेरीसाठी दोन जोड्यांचा समावेश आहे.
बीएआयच्या निवड समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संघाची निवड करण्यात आली असून हैदराबादमध्ये झालेल्या यू-19 अ.भा. ज्युनियर रॅकिंग स्पर्धेच्या विजेत्यांची थेट निवड करण्यात आली तर उर्वरित जागा नवी दिल्लीत निवड चाचणीनंतर भरण्यात आल्या आहेत. या चाचणीत अव्वल खेळाडू तसेच हैदराबादमधील उपांत्य फेरीत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता.
‘डच व जर्मन ज्युनियर स्पर्धा युवा खेळाडूंच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या काही वर्षापासून भारतीय कनिष्ठ खेळाडूंनी या स्पर्धांत आपला ठसा उमटवणारी कामगिरी केली असून नंतर ते वरिष्ठ स्तरावर खेळले आहेत,’ असे बीएआयचे सरचिटणीस संजय मिश्रा म्हणाले. बीडब्ल्यूएफच्या ज्युनियर मानांकनात भारतीय खेळाडूंनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले असून ज्युनियर खेळाडूंच्या विकासासाठी आयोजलेल्या योजनांसाठी हे चांगले लक्षण असल्याचेही ते म्हणाले. सूर्या चरिस्मा तमिरीने मागील वर्षी जर्मन स्पर्धेत मुलींचे कांस्य तर आयुष शेट्टीने मुलांच्या विभागात 2023 मध्ये कांस्य मिळविले होते.
भारतीय संघ : मुले (एकेरी)-रौनक चौहान, ज्ञाना दत्तू टी, सूर्याक्ष रावत, प्रणव राम एन. मुली (एकेरी)-आदर्शिनी श्री, तानू चंद्रा, रुजुला रामू, तन्वी रे•ाr अंदलुरी. मुले (दुहेरी)-भव्या छाब्रा-परम चौधरी, मिथिलेश पीके-विष्णू केदार कोडे, मुली (दुहेरी)-प्रगती परिदा-विशाखा टोपा, अनया बिश्त-अँजेल पुनेरा, मिश्र दुहेरी-भव्या छाब्रा-अँजेल पुनेरा, लइरमसांगा सी.-विशाखा टोपो.









